
रेल्वेचे कन्फर्म तिकीट असूनही चार प्रवाशांना विंध्याचल ते अरादरम्यान उभ्याने प्रवास करण्याची वेळ आणल्याने ग्राहक न्यायालयाने रेल्वेला 20 हजार रुपयांचा दंड ठोठावला आहे.
रेल्वेच्या बी-4 कोचमध्ये कन्फर्म तिकीट असूनही त्या जागेवर प्रवाशांच्या आधीच रेल्वेचे कर्मचारी बसले. तसेच त्यांनी जागेवरून उठण्यास नकार दिला. त्यामुळे कन्फर्म तिकीट असलेल्या प्रवाशांना उभ्याने प्रवास करावा लागला होता. या प्रवाशांनी रेल्वे अधिकाऱ्यांकडे याबाबत तक्रार करून मदत मागितली, पण त्यांना मदत मिळाली नाही. प्रवाशांना उभे राहून प्रवास करावा लागला. मनस्ताप सहन करावा लागल्यानंतर प्रवाशांनी रेल्वे सेवा आणि रेल्वे मंत्रालयाकडे तक्रार दाखल केली. याचीही दखल घेण्यात आली नाही. यानंतर प्रवाशांनी अखेर भोजपूर जिल्हा ग्राहक तक्रार निवारण आयोगात धाव घेतली. आयोगाने याप्रकरणी उत्तर मध्य रेल्वे आणि रेल्वे मंत्रालयाला प्रवाशांच्या आरक्षणाचे पैसे (1,876 रुपये) आणि वर्षाचे 8 टक्क्यांनी व्याज असे 20 हजार रुपये नुकसानभरपाई देण्याचे आदेश दिले. 60 दिवसांमध्ये हे पैसे प्रवाशांना देण्याची सूचना आयोगाने केली आहे आणि 60 दिवसांत पैसे न दिल्यास शिल्लक रक्कमेवर 10 टक्के वार्षिक व्याज आकारले जाईल, असेही आयोगाने स्पष्ट केले.





























































