
केरळ उच्च न्यायालयाने एका सुनावणीवेळी सार्वजनिक स्थळी दारू पिण्याविषयी स्पष्टीकरण केलं आहे. जोपर्यंत एखादा माणूस दारू पिऊन दुसऱ्याला त्रास होईल असं कृत्य करत नाही, तोपर्यंत सार्वजनिक ठिकाणी दारू पिणं हा गुन्हा होऊ शकत नाही, असं न्यायालयाने स्पष्ट केलं आहे.
केरळ उच्च न्यायालयात एका प्रकरणातील साक्षीदाराने याचिका दाखल केली होती. तो दारूच्या नशेत पोलीस स्टेशनमध्ये गेला होता. त्याला आरोपीची ओळख पटवायची होती. मात्र, दारू पिऊन तो स्टेशनवर हजर झाला होता. पण, त्याला आरोपीला ओळखता आलं नाही. दारू पिऊन पोलीस स्टेशनमध्ये हजेरी लावल्याने त्याच्या विरोधात तक्रार दाखल करण्यात आली होती.
या तक्रारीविरोधात त्याने न्यायालयात धाव घेतली. त्याने दाखल केलेल्या याचिकेत आरोपीची ओळख न पटवल्याने आपल्यावर खोटा गुन्हा दाखल केल्याचं म्हटलं होतं. या याचिकेवर न्यायमूर्ती सोफी थॉमस यांच्या खंडपीठासमोर सुनावणी पार पडली.
न्यायमूर्ती म्हणाले की, कुणीही जर सार्वजनिक स्थळी कुणालाही उपद्रव न देता दारू पित असेल, तर तो गुन्हा मानता येणार नाही. जोपर्यंत दारू पिणारी व्यक्ती दुसऱ्याला त्रास देत नाही, तोपर्यंत तिने दारू पिणं हे चुकीचं ठरवलं जाऊ शकत नाही. तसंच एखाद्याच्या तोंडाला दारूचा वास येणं म्हणजे ती व्यक्ती नशेत आहे असं म्हणणं देखील चूक आहे, असं स्पष्टीकरण न्यायालयाने दिलं आहे.




























































