कोरोना बाधितांनी मदतीसाठी विभाग स्तरावरील ‘वॉर्ड वॉर रूम’कडे संपर्क साधावा, महानगरपालिका प्रशासनाचे आवाहन

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

कोरोनाबाधित रुग्णांना आवश्यक व तातडीने रुग्णशय्या उपलब्ध होण्यासह कोविड-19 संबंधी त्यांच्या विविध अडचणी निकाली काढण्यासाठी महानगरपालिकेने विकेंद्रित पद्धतीने रुग्णशय्या व्यवस्थापन प्रणाली (Decentralized Hospital Bed Management) जून 2020 पासून अंमलात आणली आहे. सर्व 24 विभाग कार्यालयांच्या पातळीवर वॉर्ड वॉर रूम्स म्हणजे विभागीय नियंत्रण कक्ष कार्यान्वित आहेत. कोविड बाधित रुग्ण अथवा त्यांचे नातेवाईक ह्यांनी कोविड-19 बाबत मदत हवी असेल तर वॉर्ड वॉर रूमकडे संपर्क साधावा, असे आवाहन बृहन्मुंबई महानगरपालिका प्रशासनाकडून करण्यात येत आहे.

कोविड प्रतिबंधात्मक उपाययोजनांमध्ये बाधित रुग्णांना आवश्यकतेनुसार रुग्णालयांमध्ये रुग्ण शय्या मिळवून देणे, ही महत्त्वाची बाब आहे. त्यासाठी वॉर्ड वॉर रूम महत्वाची कामगिरी बजावत आहेत. जून 2020 पासून विकेंद्रित पद्धतीने 24 विभाग कार्यालयांच्या स्तरावरून रुग्णांसाठी ही कार्यप्रणाली नियमितपणे सुरु आहे. यातून कोविड बाधित रुग्णांना विभाग स्तरावरुनच अधिक जलद, सुलभ व प्रभावीपणे आरोग्य सेवा देण्यास मदत होत आहे.

या वॉर्ड वॉर रूम अर्थात विभागीय नियंत्रण कक्षांचे संपर्क क्रमांक पुढीलप्रमाणे आहेत.

ए विभाग 2270 0007, बी विभाग 2375 9023, सी विभाग 2219 7331, डी विभाग 23835004, ई विभाग 2379 7901, एफ/दक्षिण विभाग 2417 7507, एफ/उत्तर विभाग 24011380, जी/दक्षिण विभाग 2421 9515, जी/उत्तर विभाग 2421 0441.

एच/पूर्व विभाग 2663 5400, एच/पश्चिम विभाग 2644 0121, के/पूर्व विभाग 2684 7000, के/पश्चिम विभाग 2620 8388, पी/दक्षिण विभाग 2878 0008, पी/उत्तर विभाग 2844 0001, आर/दक्षिण विभाग 2805 4788, आर/उत्तर विभाग 2894 7350, आर/मध्य विभाग 2894 7360.

एल विभाग 7678061274 किंवा 7710870510, एम/पूर्व विभाग 2552 6301, एम/पश्चिम विभाग 2528 4000, एन विभाग 2101 0201, एस विभाग 2595 4000, टी विभाग 2569 4000.

प्रत्येक ‘वॉर्ड वॉर रूम’ मध्ये दिल्या 24×7 तत्वावर तीन सत्रांमध्ये अखंडपणे वैद्यकीय अधिकारी, आवश्यक इतर कर्मचारी कार्यरत आहेत. वॉर्ड वॉर रुममुळे कोरोना बाधितांना प्रभावी सेवा देण्यात महत्त्वाचे पाऊल उचलले जात आहे. अधिकाधिक कोविड रुग्णांपर्यंत पोहोचून त्यांना सेवा दिली जात आहे. गरजू कोरोना बाधितांना तात्काळ योग्य रुग्णालयात दाखल करण्याचे काम सुलभ व जलद गतीने होत आहे. विभाग कार्यालयांना कोरोना रुग्णसेवेसाठी दिलेल्या रुग्णवाहिकांच्या सेवेचे व्यवस्थापनही विभागीय कक्षाद्वारे होत असल्याने रुग्णवाहिकांचा प्रतिसाद कालावधी वाढला आहे.

यासोबत गृह विलगीकरणात असलेल्या कोविड बाधितांशी सातत्याने संपर्क साधून त्यांची अद्ययावत माहिती घेणे, नियमांचे पालन होत असल्याची खातरजमा करणे, स्थानिक पातळीवर कामकाजात योग्य समन्वय साधणे ह्यातून वॉर्ड वॉर रूम यंत्रणेने मध्यवर्ती यंत्रणेवरील ताण हलका तर केलाच पण मुख्य म्हणजे कोविड बाधितांच्या समस्यांचे निराकरण करण्यात महत्वाची भूमिका बजावली आहे.

कोविड बाधित रुग्ण अथवा त्यांचे नातेवाईक ह्यांनी योग्य त्या मदतीसाठी आपापल्या विभाग स्तरावरील वॉर्ड वॉर रूम कडे संपर्क साधावा, असे नम्र आवाहन बृहन्मुंबई महानगरपालिका प्रशासनाकडून करण्यात येत आहे.