
कोरोना लसीकरणासंदर्भात केंद्र सरकारने एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. देशात एक एप्रिलपासून लसीकरणाची व्याप्ती वाढवण्यात येणार आहे. एक एप्रिलपासून 45 वर्षांहून अधिक वय असलेल्या प्रत्येक व्यक्तीला कोरोनाची लस घेता येणार आहे. त्यामुळे होळीनंतर कोरोना लसीकरण मोहिमेचा वेग अधिक वाढेल.
आता पर्यंतची एका दिवसातील सर्वाधिक लसीकरणाची संख्या सोमवारी समोर आली. सोमवारी 32 लाख 54 हजार इतके डोस देण्यात आले आहेत. फेब्रुवारी महिन्यात हे प्रमाण सरासरी 3 लाख 77 हजार इतके होते मार्च मध्ये ते चार पटीने वाढले. तर गेल्या 7 दिवसांत लसीकरण आणखी मोठ्या प्रमाणावर झाल्याचं पाहायला मिळालं असं जावडेकर यांनी सांगितलं.
केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांनी मंगळवारी पत्रकार परिषदेत घोषणा केली की, 45 वर्ष वयाहून अधिक वयाच्या लोकांना रजिस्ट्रेशन करावे लागेल आणि त्यांना सहज सरकारी-खासगी केंद्रांवर लस मिळेल.
आतापर्यंत देशात आरोग्य कर्मचारी, कोरोना वॉरियर्स यांच्यासोबतच 60 वर्ष वयावरील व्यक्तींना, तसंच गंभीर आजार असलेल्या 45 वर्षावरील व्यक्तींनाच लस उपलब्घ होत होती.
पत्रकार परिषदेत प्रकाश जावडेकर यांनी माहिती दिली की देशात आतापर्यंत 4.85 कोटी नागरिकांनी लस घेतली आहे. तर जवळपास 80 लाख नागरिकांनी कोरोनाचा दुसरा डोस देखील घेतला आहे.



























































