कोरोना पाठ सोडेना! सहा राज्यांमध्ये 84% रुग्ण, गुजरातमध्येही सोमवारी विक्रमी वाढ

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
फाईल फोटो

कोरोना रुग्णांची संख्या महाराष्ट्रात सर्वाधिक आहे. असे असले तरी महाराष्ट्र, पंजाब पाठोपाठ गुजरात, छत्तीसगड, मध्यप्रदेशात कोरोनाचा प्रादुर्भाव वेगानं होत आहे.

गुजरात

गुजरातमध्ये 24 तासात कोरोनाचे 1640 नवे रुग्ण समोर आले आहेत. कोरोना काळात गुजरातमध्ये एका दिवसात इतके रुग्ण आढळण्याची ही पहिलीच वेळ आहे. याआधी गेल्यावर्षी गुजरातमध्ये एका दिवसात कोरोनाचे सर्वाधिक रुग्ण 27 नोव्हेंबर रोजी आढळले होते. ती संख्या 1,607 इतकी होती. सोमवारी गुजरातमध्ये 2 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. यामुळे राज्यात कोरोनाने मृत पावलेल्या व्यक्तींची एकूण संख्या 4,468 इतकी झाली आहे. कोरोनाग्रस्तांची आतापर्यंतची एकूण संख्या 2,87,903 झाली आहे. सध्या राज्यात 7,847 केस अॅक्टिव्ह आहेत.

छत्तीसगड

छत्तीसगडमध्ये गेल्या 24 तासांत 1525 कोरोनाचे रुग्ण आढळले आहेत. राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव झालेल्या रुग्णांची एकूण संख्या 3,25,678 इतकी झाली आहे. राज्यात सोमवारी 22 जण कोरोनामुक्त झाले आहेत. तर 505 जणांनी होम आयसोलेशनचा काळ पूर्ण केला आहे. राज्यात आणखी 10 कोरोनाग्रस्त रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

छत्तीसगडमध्ये कोरोना संक्रमण वेगाने वाढत असल्याने राज्य सरकारने आंगणवाड्या बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच इंजिनिअरींग, पोलिटेक्निक, आयटीआय, कौशल्य विकास प्रशिक्षण संस्था आणि सर्व शाळा तात्काळ बंद करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. राज्यात 10 वी आणि 12 वीच्या विद्यार्थ्यांना वगळून इतर सर्व इयत्तांतील विद्यार्थ्यांना पुढल्या इयत्तेत पाठवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

मंगळवारी सकाळी जारी करण्यात आलेल्या आकड्यांनुसार देशात गेल्या 24 तासात 40,715 नवे रुग्ण आढळले आहेत. त्यामुळे एकूण कोरोनाग्रस्तांची संख्या 1,16,86,796 इतकी झाली आहे. 199 रुग्णांचा मृत्यू झाल्याने एकूण मृतांचा आकडा वाढून 1,60,166 झाली आहे. देशात सध्या 3,45,377 अॅक्टिव्ह रुग्ण आहेत. तर 1,11,81,253 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. तर आता पर्यंत एकूण 4,84,94,594 नागरिकांना लस देण्यात आली आहे.