आयपीएलला ‘फुलस्टॉप’? मद्रास उच्च न्यायालयामध्ये याचिका दाखल, 12 मार्चला सुनावणी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

जीवघेण्या कोरोनाचा हिंदुस्थानातही शिरकाव झाला असून त्याचा फटका 29 मार्चपासून खेळलेल्या जाणाऱ्या इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल) क्रिकेट स्पर्धेलाही बसण्याची शक्यता आहे. एकीकडे कर्नाटक सरकारने आयपीएल लढतींवरच बंदी घालण्याचा निर्णय घेतला असून दुसरीकडे तमीळनाडूमध्ये आयपीएलविरोधात मद्रास हायकोर्टामध्ये (Madras High Court) याचिका दाखल केली आहे.

आयपीएलच्या 13 व्या मोसमाला 29 मार्चला सुरुवात होणार आहे. 29 मार्च ते 24 मे दरम्यान ही स्पर्धा रंगणार आहे. परंतु कोरोना व्हायरसचा वाढता धोका पाहता आयपीएल स्पर्धा रद्द होण्याची शक्यता आहे. या स्पर्धेविरोधात वकील जी. अॅलेक्स बेनजीगर यांनी मद्रास हायकोर्टामध्ये याचिका दाखल केली आहे. जस्टिस एमएस सुधिंद्र आणि कृष्णन रामास्वामी यांच्या खंडपीठासमोर 12 मार्चला सुनावणी होणार आहे.

वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन (डब्ल्यूएचओ)च्या वेबसाईटने दिलेल्या माहितीनुसार, आतापर्यंत कोरोना व्हायरसपासून (COVID-19) वाचण्यासाठी एकही लस तयार झालेली नाही. कोरोना व्हायरस जगभरात वेगाने पसरत असून हजारो लोक यामुळे मृत्युमुखी पडत आहे. याचा प्रकोप वाढत असल्याने आयपीएलसारखी स्पर्धा रद्द करण्यात यावी, अशी मागणी याचिकाकर्त्याने केली आहे. तसेच इटली फेडरेशन लीग ही जगातिस सर्वात जुनी फुटबॉल लीग आहे यावरही कोरोनाचा प्रभाव पडला आहे. 3 एप्रिलपर्यंत इटली सरकारने फुटबॉल सामने दर्शकांविना खेळवण्याचे ठरवले आहे. याचाच आधार घेत याचिकाकर्त्याने बीसीसीआयला आयपीएल 2020 स्पर्धा रद्द करण्याची मागणई केली आहे.

…तरच धोनीचा ‘टीम इंडिया’साठी विचार होईल – बीसीसीआय

सौरव गांगुली यांचे उत्तर
बीसीसीआयचे अध्यक्ष सौरव गांगुली यांनी यापूर्वीच आयपीएल 2020 स्पर्धा रद्द करण्याबाबत कोणताही निर्णय झाला नसल्याचे सांगितले आहे. स्पर्धेदरम्यान कोरोना व्हायरसपासून वाचण्यासाठी आवश्यक त्या उपाययोजना केल्या जातील असे गांगुली यांनी सांगितले. आम्ही स्पर्धेदरम्यान सावधानता बाळगू. आम्ही आमच्या मेडीकल पथकावर अवलंबुन असून ते सांगतील तशा उपाययोजना आम्ही करू. मेडीकल पथक रुग्णालयांच्या संपर्कात असून डॉक्टर सांगतील त्याप्रमाणे आम्ही उपाय करू, असेही गांगुलीने सांगितले.

…तर प्रेक्षकांशिवाय खेळवणार देशभरातील आयपीएल लढती

आयपीएल पुढे ढकलणे संघमालक व बीसीसीआयसाठी अव्यवहार्य
आयपीएलमधून संघमालक आणि बीसीसीआयला शेकडो करोड रुपयांचे उत्पन्न मिळते. त्यात पुरस्कर्ते आणि जाहिरातदार यांच्याकडून मिळणारे उत्पन्न फार मोठे आहे. ही लीग पुढे ढकलल्यास या दोघांनाही मोठा फटका बसणार आहे. त्यामुळे स्पर्धा पुढे ढकलण्यापेक्षा प्रेक्षकांनाच लढतींना प्रवेश न देण्याची शक्कल बोर्ड आणि संघमालक लढवणार असे स्पष्ट झाले आहे. प्रेक्षकांसाठी तिकीट विक्रीतून संघमालक आणि बीसीसीआय यांना फारतर 10 कोटी रुपयांचे उत्पन्न मिळते. तेवढय़ावर पाणी सोडण्याची त्यांची तयारी आहे. तसे झाल्यास क्रिकेटशौकीन मात्र मोठय़ा आनंदाला मुकणार हे निश्चित. यासंदर्भात महाराष्ट्राचे आरोग्यमंत्री आणि बीसीसीआय यांच्यात विशेष बैठक होणार आहे. या बैठकीत कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी काय दक्षता घ्यायची त्याचा निर्णय सरकार आणि क्रिकेट बोर्ड घेणार आहे.