
नशेबाजांकरिता कफ सिरपच्या बाटल्यांची तस्करी आणि विक्री करणाऱ्या टोळीतील आणखी दोघांना शिवाजीनगर पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. त्यातील एक सुरतचा तर दुसरा मुंब्य्राचा आहे. या टोळीकडून पोलिसांनी तब्बल 2264 कफ सिरपच्या बाटल्या तसेच वाहतुकीसाठी वापरली जाणारी ऑटोरिक्षा, मोबाईल, ग्राहक व पोलिसांवर वॉच ठेवण्यासाठी लावलेले सीसीटीव्ही कॅमेरे असा 14 लाख 30 हजार किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
गोवंडीच्या शिवाजीनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत पोलिसांनी नशेबाजांना कफ सिरप विक्रीचा सुरू असलेला धंदा उद्ध्वस्त केला होता. त्यावेळी घरातील माळ्यावर लपवून ठेवलेला पाच लाख 25 हजार किंमतीचा कफ सिरपचा साठा जप्त करून एकाला पकडण्यात आले होते. त्या आरोपीच्या चौकशीत काही खुलासे झाले.
त्यानुसार, मुख्य आरोपीच्या सांगण्यावरून अल्पवयीन मुलांकरवी कफ सिरपच्या बाटल्या नशेबाजांना विक्री करत असल्याचे समोर आले. त्यावेळी आरोपीकडून आणखी 14 कोडियनमिश्रित कफ सिरपच्या बाटल्या आणि अमली पदार्थांची वाहतूक करण्याकरिता वापरण्यात येणारी एक रिक्षा हस्तगत करण्यात आली होती. त्यानंतर या टोळीचा म्होरक्या आणि कफ सिरपच्या बाटल्यांची तस्करी करणारा मुख्य आरोपी सुरतहून हा कारभार करीत असल्याचे कळताच वरिष्ठ निरीक्षक अर्जुन रजाणे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस पथकाने सुरतमध्ये जाऊन त्या ड्रग्ज तस्कराच्या मुसक्या आवळल्या. दरम्यान, या आरोपींचा मुंब्य्रात एक साथीदार असून तोदेखील नशेबाजांना कफ सिरप विक्री करीत असल्याचे समजल्यावर त्यालादेखील पकडण्यात आले.




























































