कथित आर्थिक अफरातफर प्रकरण, हसन मुश्रीफ यांच्या मुलांना 1 जूनपर्यंत अंतरिम दिलासा

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

कथित आर्थिक अफरातफर प्रकरणात राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते, माजी मंत्री हसन मुश्रीफ यांच्या तीन मुलांना विशेष पीएमएलए न्यायालयाने 1 जूनपर्यंत ईडीच्या कारवाईपासून संरक्षण दिले आहे. पुढील सुनावणीपर्यंत ईडीने मुश्रीफ यांच्या तिन्ही मुलांना अटक वा अन्य कारवाई करू नये, असे याआधी दिलेले निर्देश न्यायालयाने गुरुवारी कायम ठेवले.

कोल्हापूर जिल्ह्यातील सरसेनापती संताजी घोरपडे साखर कारखान्याशी संबंधित कथित आर्थिक अफरातफर प्रकरणात ईडीने मुश्रीफ यांच्या मालमत्तांवर छापेमारी केली. याअनुषंगाने ईडीकडून निष्कारण अटक केली जाऊ शकते, अशी भीती व्यक्त करीत हसन मुश्रीफ यांचे मुलगे नाविद, आबिद आणि साजिद यांनी विशेष पीएमएलए न्यायालयात अटकपूर्व जामिनासाठी दाद मागितली आहे.

त्यांच्या अर्जांवर गुरुवारी न्यायाधीश एम. जी. देशपांडे यांच्यापुढे युक्तिवाद होणार होता, मात्र न्यायालय इतर प्रकरणांच्या सुनावणीत व्यस्त होते. त्यामुळे न्यायालयाने मुश्रीफ यांच्या तिन्ही मुलांना ईडीच्या कारवाईपासून दिलेले अंतरिम संरक्षण कायम ठेवत पुढील सुनावणी 1 जूनपर्यंत तहकूब केली.