
कोरोनामुळे अनेकांना वैयक्तिक, आर्थिक नुकसानाला सामोरं जावं लागलं आहे. अनेक जण या काळात अनाथ झाले. अशाच अनाथ भावंडांच्या मदतीला इंदूरकर धावले असून त्यांनी कर्ज चुकवण्यासाठी निधी जमा केला आहे.
आकाश सिंग (21) आणि इशिता (18) ही दोन सख्खी भावंडं मध्य प्रदेशच्या इंदूर येथे राहतात. त्यांचे वडील उपेंद्र नारायण सिंग आणि आई सोनी सिंग यांचं कोरोनाने निधन झालं आणि हे दोघे अनाथ झाले. उपेंद्र यांनी जवळपास 15 लाख रुपयांचं गृहकर्ज आणि 9 लाख रुपयांचं वाहनकर्ज घेतलं होतं. उपेंद्र आणि सोनी यांच्या निधनानंतर घराचा काही भाग भाड्यावर देऊन सिंग भावंडांनी वाहनकर्जाच्या हप्त्याची सोय केली. मात्र, 14.5 लाखांचं गृहकर्ज फेडण्याची त्यांची आर्थिक क्षमता नव्हती.
त्यामुळे त्यांनी कर्जाचे हप्ते जमा करणाऱ्या कलेक्टरला गाठलं आणि आपली परिस्थिती कथन केली. ही बातमी इंदूरकरांच्या कानी गेल्यानंतर अनेक देणगीदार पुढे आले. त्यातील काही सिंग यांच्याच संकुलात राहणारे होते. काही बिल्डर होते. त्यांनी कलेक्टरला भेटून 14.5 लाख रुपयांचं कर्ज चुकवण्याची तयारी दाखवली. इंदूरकर नुसतं बोलून थांबले नाहीत तर त्यांनी निधी गोळा करून ती रक्कम जमा देखील केली.
आकाश हा सध्या बीटेकच्या तिसऱ्या वर्षाला आहे. तर इशिता सध्या अकरावीत शिकत असून तिला कोरोना काळात सुरू झालेल्या मुख्यमंत्री बाल कल्याण योजनेअंतर्गत मोफत शिक्षण आणि रेशन मिळतं. तसंच दर महा 5 हजार रुपयेही मिळत आहेत.




























































