
अहमदाबादच्या मैदानात रविवारी टीम इंडियाने पाहुण्या वेस्ट इंडीज संघावर शानदार विजय मिळवत 2 वन-डेच्या मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली. या विजयासह हिंदुस्थानी क्रिकेट शौकिनांना एक आनंददायी गोष्ट मैदानात पाहायला मिळाली. हिटमॅन रोहित शर्मा दुखापतीतून सावरल्यावर प्रथमच वन-डेसाठी टीम इंडियाचा पूर्णवेळ कर्णधार म्हणून मैदानात उतरला होता. माजी कर्णधार विराट कोहलीही काल रोहितच्या खांद्याला खांदा लावून त्याला विजयासाठीची व्यूहरचना सुचवत होता. वेस्ट इंडीज फलंदाजी करीत असताना 20व्या षटकात तर चक्क रोहित कर्णधार असताना विराट मैदानात क्षेत्ररक्षण लावताना दिसला. रोहितनेही मोठय़ा मनाने विराटची कृती स्वीकारली. दोन आजी-माजी कर्णधारांची ही अफलातून केमिस्ट्री हिंदुस्थानी क्रिकेट रसिकांना सुखावून सोडणारी होती.
विराटला कर्णधारपदावरून दूर केल्यावर त्याच्यात आणि नवा कर्णधार रोहित शर्मामध्ये धुसफूस असेल या समजाला उभय ज्येष्ठ खेळाडूंनी बगल दिली आणि मैदानात टीम इंडियासाठी ‘हम साथ साथ है’ हे दाखवून दिले. विराट प्रथमच रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली खेळत होता, पण त्याच्या चेहऱयावर अथवा वागणुकीत कुठेही नाराजी काल दिसली नाही.
संघासाठी काय पण…
हिंदुस्थानी संघासाठी स्वतःला पूर्णपणे झोकून देण्याची वृत्ती विराटने कालच्या लढतीतही दाखवली. विशेष म्हणजे काही वेळेस विराट संघाचे क्षेत्ररक्षण लावताना दिसला. रोहितनेही त्याला विरोध न करण्याचा मोठेपणा दाखवून देत संघाच्या हितापुढे वैयक्तिक इगो निरर्थक आहे याचा प्रत्यय हिंदुस्थानी क्रिकेट शौकिनांना आणून दिला. संघासाठी काय पण…या भावनेने दोन्ही आजी-माजी हिंदुस्थानी कर्णधारांना खेळताना पाहून देशातील क्रिकेट शौकीन मनोमन सुखावले आहेत. हीच संघभावना या दोन महान क्रिकेटपटूंनी कायम ठेवावी अशी उभय खेळाडूंच्या चाहत्यांची धारणा आहे.
डीआरएस घेताना अनेकदा विराटने दिला सल्ला
विंडीजविरुद्धच्या पहिल्या लढतीत टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्माने घेतलेले बहुतांश डीआरएस यशस्वी ठरले, पण त्यासाठी माजी कर्णधार विराट कोहलीने रोहितला महत्त्वपूर्ण सल्ला दिला. रोहितनेही आपल्या माजी कर्णधाराच्या सल्ल्याला मान दिला. त्यानंतर विंडीजने फलंदाज बाद झाल्यावर विराट आणि रोहित एकदिलाने आनंद साजरा करतानाचे दृश्य हिंदुस्थानी क्रिकेट शौकिनांना सुखावून सोडणारे होते. या दोन महान खेळाडूंची मैदानातील ही सांघिक कृती टीम इंडियाला पुन्हा क्रिकेट जगताच्या शिखरावर नेऊन ठेवेल असा विश्वास अनेक क्रिकेट शौकिनांनी बोलून दाखवला आहे.




























































