
मतदान अपडेट करण्याच्या बहाण्याने सायबर ठगाने वृद्धाची फसवणूक केली. ठगाने वृद्धाच्या खात्यातून ४ लाख ८३ हजार रुपये काढले. याप्रकरणी माहीम पोलिसांनी अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा नोंद केला आहे.
तक्रारदार हे ज्येष्ठ नागरिक असून ते माहीम येथे राहतात. सध्या मतदान अपडेटसाठी नवीन फॉर्मचे काम सुरू आहे. तक्रारदार यांना त्यांचे मतदान ओळखपत्र अपडेटसाठी दिले होते. ७ ऑगस्टला त्यांना एका नंबरवरून फोन आला. त्याने त्याचे नाव सांगून तो निवडणूक आयोगाचा कर्मचारी असल्याचे भासवले. मतदान ओळखपत्राची दिलेली माहिती वेगळी आहे. त्यामुळे त्याचा फॉर्म अपडेट होणार नाही. तुमचे नागरिकत्व रद्द होईल असे सांगून भीती दाखवली.
निवडणूक आयोगाचा कर्मचारी असल्याचे वाटल्याने तक्रारदार यांनी त्याच्याकडे विचारणा केली. त्याचा फायदा ठगाने घेतला. ठगाने त्यांना एक लिंक पाठवून माहिती अपलोड करण्यास सांगितली. त्यावर विश्वास ठेवून तक्रारदार यांनी त्या लिंकवर माहिती भरली. तसेच ठगाने त्यांना डेबिट कार्डवरून पाच रुपये रुपये ट्रान्स्फर करण्यास सांगितले. मात्र रक्कम ट्रान्स्फर होत नसल्याने तक्रारदार यांनी त्यांच्या क्रेडिट कार्डवरून पैसे पाठवले.
माहिती भरल्यावर तुमचे कार्ड अपडेट होईल असे सांगून त्याने फोन कट केला. काही वेळाने त्यांना बँकेतून पैसे काढल्याचा मेसेज आला. खात्यातून ४ लाख ८३ हजार रुपये गेल्याचे लक्षात आले. फसवणूक झाल्याचे लक्षात येताच त्यांनी माहीम पोलीस ठाण्यात धाव घेतली. पोलिसांनी अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा नोंद करून तपास सुरू केला आहे.
तरुणीवर लैंगिक अत्याचार करण्याचा प्रयत्न करणारा अटकेत
तरुणीचा पाठलाग करून तिच्यावर लैंगिक अत्याचार करण्याचा प्रयत्न करणाऱ्याला मुलुंड पोलिसांनी अटक केली. अनिल करोटिया असे त्याचे नाव असून तो ठाण्याचा रहिवासी आहे. ६ ऑगस्टला पीडित मुलगी ही पहाटेच्या सुमारास रस्त्याने जात असताना अनिलने तिचा पाठलाग केला. त्यानंतर या विकृताने तिच्यावर लैंगिक अत्याचार करण्याचा प्रयत्न केला. त्या झटापटीत पीडित मुलीला दुखापत झाली. या प्रकरणी मुलुंड पोलिसांनी गुन्हा नोंद केला. पोलीस उपायुक्त पूर्व परिमंडळ ३ चे अभयसिंह देशमुख ‘यांच्या सूचनेनुसार ६ पथकांनी परिसरातील २५० हून अधिक सीसीटीव्ही फुटेजची तपासणी केली व ठाण्याच्या वागळे इस्टेट येथून अनिलला ताब्यात घेऊन अटक केली.
वाहन अपघातांत दोघांचा मृत्यू
शहरात वाहन अपघातांत दोघांचा मृत्यू झाल्याची घटना माहीम आणि साकीनाका येथे घडली. अब्दुल समद आणि मनोज गिरी अशी त्यांची नावे आहेत. या प्रकरणी साकीनाका आणि माहीम पोलिसांनी गुन्हा नोंद केला आहे.
साकीनाका येथे चारचाकी वाहनाच्या चाकाखाली चिरडून अब्दुल समद या एक वर्षीय चिमुकल्याला गंभीर दुखापत झाली. त्यात त्याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला, तर माहीम परिसरात मनोज गिरी हे सायंकाळी पॅरॅडाईज सिनेमासमोरील बाजूने रस्ता ओलांडत होते तेव्हा त्यांना मोटारसायकलने धडक दिली. या धडकेत गंभीर दुखापत झाल्याने मनोज यांचा मृत्यू झाला.

























































