टीम इंडियाला रोखण्यासाठी स्मिथ, वॉर्नरची एण्ट्री

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन, सिडनी

हिंदुस्थानला कसोटी मालिकेत विजयापासून रोखण्यासाठी ऑस्ट्रेलियाने फिल्डिंग लावली त्याअंतर्गत स्टीवन स्मिथ व डेव्हिड वॉर्नर यांना मार्गदर्शनासाठी बोलावण्यात आले आहे. ट्वेण्टी-20 मालिका बरोबरीत राखणाऱया विराट कोहलीच्या ब्रिगेडला रोखण्यासाठी त्यांनी हे पाऊल उचलले आहे.

बॉल टॅम्परिंग प्रकरणात अडकलेल्या स्टीवन स्मिथ व डेव्हिड वॉर्नर या दोघांचाही शिक्षेचा काळ अद्याप संपलेला नाही. त्यामुळे 6  डिसेंबरपासून हिंदुस्थान-ऑस्ट्रेलिया यांच्यामध्ये सुरू होणाऱया चार कसोटी सामन्यांच्या मालिकेत ते खेळणार नाहीत, पण दोघेही ऑस्ट्रेलियन खेळाडूंना मार्गदर्शन करणार आहेत.

कोहलीमुळे वाढलीय चिंता

कोहलीच्या बॅटमधून सध्या धावांचा पाऊस पडतोय. गेल्या ऑस्ट्रेलियन दौऱयातही त्याने धावाच धावा उभारल्या होत्या. अखेरच्या ट्वेण्टी-20तही त्याने 61 धावांची खेळी करून टीम इंडियाला बरोबरी साधून दिली. याच पार्श्वभूमीवर कांगारूंची चिंता वाढलीय. त्यामुळेच त्यांनी डेव्हिड वॉर्नर, स्टीवन स्मिथ यांना नेट प्रॅक्टिसमध्ये आमंत्रित केले आहे.

स्मिथ सर्वोत्तम फलंदाज – मिचेल स्टार्क

हिंदुस्थानच्या फलंदाजांना रोखण्यासाठी सपोर्ट स्टाफसह चर्चा सुरू आहे. स्टीवन स्मिथ व डेव्हिड वॉर्नर हे दोघेही दिग्गज खेळाडू आहेत. त्यामुळे नेट प्रॅक्टिसमध्ये दोघांचा सहभाग महत्त्वाची भूमिका बजावणार आहे. तसेच आम्हा गोलंदाजांनाही स्टीवन स्मिथसारख्या जगातील सर्वोत्तम फलंदाजाला गोलंदाजी करून चांगला सराव करता येणार आहे, असे स्पष्ट मत व्यक्त केले आहे मिचेल स्टार्क याने.

अन्य फलंदाजांनी कोहलीला साथ द्यायला हवी – गिलख्रिस्ट

हिंदुस्थान – ऑस्ट्रेलिया यांच्यामधील कसोटी मालिका कोण जिंकणार हे आताच सांगता येणार नाही. सुरुवातीला यजमानांचे पारडे जड असेल, पण हिंदुस्थानला मालिका जिंकावयाची असल्यास कर्णधार विराट कोहलीला इतर फलंदाजांनी साथ द्यायला हवी. त्यांनीही मोठी धावसंख्या उभारण्यात मदत करायला हवी, असे मत ऑस्ट्रेलियाचा माजी खेळाडू ऍडम गिलख्रिस्ट यावेळी व्यक्त केले.