
तीर्थक्षेत्र शनि शिंगणापूर येथील कायम कर्मचारी यांचे सेवानिवृत्ती वय 58 वरून 60 वर्षं करण्याच्या तत्कालीन विश्वस्त मंडळांनी घेतलेल्या निर्णयाला विधी व न्याय विभाग यांनी मान्यता दिली आहे. श्री शनैश्वर देवस्थानचे कार्यकारी अधिकारी यांनी राज्य शासनाच्या विधी व न्याय विभागाकडे शनि शिंगणापूर देवस्थान कायम कर्मचारी व अधिकारी यांचे सेवानिवृत्तीच्या वय मर्यादेबाबत मे महिन्यात मार्गदर्शनासाठी पत्रव्यवहार केला होता. त्या अनुषंगाने शनैश्वर देवस्थानच्या आस्थापनातील कायम कर्मचाऱ्यांचे सेवानिवृत्तीचे वय पूर्व विश्वस्त मंडळाने 6 नोव्हेंबर 2023 रोजी ठराव नंबर 6 अन्वये 58 वरून 60 वर्षं केलेले आहे.
सद्यस्थितीत श्री शनैश्वर देवस्थान येथील कर्मचारी-अधिकारी यांच्या सेवेचे नियम अस्तित्वात नसल्याने श्री शनैश्वर देवस्थान विश्वस्त व्यवस्था अधिनियम 2018च्या कलम (21)(2) व कलम 22 मधील तरतूद लक्षात घेता, सेवा नियम निश्चित होईपर्यंत निवृत्ती वय 60 कायम ठेवण्यात यावे, असा आदेश विधी न्याय विभागाने देवस्थानला दिला आहे.



























































