दिल्ली डायरी – देवभूमीत ‘रावत गेले, रावत आले’!

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

>>  नीलेश कुलकर्णी

‘पंत गेले, राव आले’, या उक्तीप्रमाणे देवभूमी मानल्या जाणाऱया उत्तराखंडमध्ये त्रिवेंद्र रावत यांची मुख्यमंत्रीपदाची जागा खासदार तीरथसिंग रावत यांनी घेतली. पत्ते पिसावेत आणि एक्क्याची उतारी यावी त्याप्रमाणे भाजपच्या श्रेष्ठींनी एका रावतला मुख्यमंत्रीपदावरून हटवून दुसऱया रावतला नेमले. उत्तराखंडच्या निवडणुकांना वर्षभराचा कालावधी आहे. मात्र मावळते मुख्यमंत्री त्रिवेंद्र रावत यांना हटवले नसते तर देवभूमीची सत्ता भाजपला पुन्हा मिळणे दुरापास्तच होते. कारण त्रिवेंद्र यांचा कारभारच तसा होता. आता देवभूमीत ‘रावत गेले, रावत आले’ असे झाल्याने भाजपला काय राजकीय फायदा होतो हे आगामी निवडणुकीतच समजेल.

‘चाल, चरित्र और चेहरा’ याची टिमकी भाजपवाले नेहमीच वाजवत असतात. देवभूमीत भाजपच्या चाल, चरित्र व चेहऱयाचे पुरते वस्त्रहरण झाले. संघाच्या मुशीत घडलेल्या त्रिवेंद्र रावतांच्या काळात भ्रष्टाचार शिगेला पोहोचला, अंधाधुंदी माजली. मुख्यमंत्र्यांचे दर्शन सामान्य नागरिकांनाच काय त्यांच्या सहकारी मंत्र्यांना दुर्लभ झाले. लॉक डाऊनच्या काळात सर्वाधिक हालअपेष्टा उत्तराखंडच्या लोकांच्या झाल्या. मुख्यमंत्र्यांचे सरकार दोन प्रशासकीय अधिकारी चालवायचे. त्यात एक महिला अधिकारी तर ‘मिनी सीएम’ अशाच तोऱयात वावरायच्या. एखादा मुख्यमंत्री किती अप्रिय असावा, याचे त्रिवेंद्र रावत हे जणू प्रतीकच बनले. देवळांमधले पुजारी त्यांनी रस्त्यावर आणले. देवदेवळांच्या बाबतीत कधी पुरोगामी म्हणविणाऱया काँगेसी मुख्यमंत्र्यांनी राजकारण केले नाही ते हिंदुत्ववादी म्हणवून घेणाऱया त्रिवेंद्र रावतांनी करून दाखविले. रावतांच्या हिंदू विरोधी धोरणांमुळे साधू महंत, पुजारी रस्त्यावर आले. देवभूमीत अनागोंदी माजली आणि त्याची अखेर त्रिवेंद रावतांना गृहस्थाश्रम धरावा लागला.

उत्तराखंडचे नवे मुख्यमंत्री तीरथसिंग रावत सध्या देशभरात लोकप्रियतेच्या शिखरावर आहेत. याचा अर्थ त्यांनी देवभूमीत गेल्या गेल्या आपले पूर्वाश्रमी त्रिवेंद्र यांनी निर्माण केलेली अनागोंदी चुटकीसरशी संपवून रामराज्य वगैरे आणलेले नाही. एकीकडे त्यांनी मुलींच्या जीन्सच्या फॅशनबद्दल बोलून वाद ओढवून घेतला आणि दुसरीकडे पंतप्रधानांची थेट रामाशी व महादेवाशी तुलना केली. भाजप सरकारच्या काळात जसा देशभर वैचारिक आणि सर्वच बाबतीत गोंधळ आहे तशीच स्थिती बहुधा भाजपातील नेत्यांचीही झालेली असावी. यापूर्वी काहींनी मोदींची तुलना विष्णू अवताराशी केली, काहींनी मोदी चालिसा लिहून हनुमानाशी तुलना केली. आता तीरथ यांनी येणाऱया पिढय़ा मोदींची पूजा करतील, असे मोठे भाकित वर्तवले आहे. आधीच्या रावतांपेक्षा नवीन रावत फार वेगळे नाहीत, हे तीरथ यांनी फार लवकर दाखवून दिले. मुख्यमंत्री केल्याबद्दल त्यांना मोदींची आरती ओवाळणे अपरिहार्य आहे, मात्र हीच आरती त्यांनी देवभूमीच्या हिताची केली तर भाजपला पुढील निवडणुकीत आशा राहील. अन्यथा उत्तराखंडसारखे हिंदुत्वाची आयती मशागत असलेले राज्य गमवायची वेळ येऊ शकते. म्हणूनच तिथे तातडीने नेतृत्वबदल करण्यात आला. राज्याच्या मंत्र्यांना भेटण्यासाठी माजी मुख्यमंत्री त्रिवेंद रावतांकडे दोन मिनिटे वेळ नसायचा, हेही जनतेने पाहिले. त्यानंतर झालेला नेतृत्वबदल भाजपला कितपत लाभदायक ठरतो ते यथावकाश कळेलच. नव्या मुख्यमंत्री महोदयांनी ‘जीन्स’च्या पॅण्टची ‘रफू’ करण्यापेक्षा व मोदींच्या आरत्या ओवाळण्यापेक्षा देवभूमीच्या विकासाकडे लक्ष दिलेले भाजपच्या दृष्टीने अधिक बरे राहील!

[email protected]