नागरी निवारालगतच्या नाल्यांना संरक्षक भिंत, शिवसेनेचा पाठपुरावा 

गोरेगाव पूर्व, आयटी पार्क नाल्याची तत्काळ दुरुस्ती करण्यात येणार असून नागरी निवारालगत असलेल्या नाल्यांना संरक्षक भिंतही बांधण्यात येणार आहे. यासाठी निविदा प्रक्रिया तातडीने राबवण्यात येणार आहे. शिवसेनेच्या (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पाठपुराव्यामुळे हे काम करण्यात येत आहे.

सोमवारी झालेल्या अतिवृष्टीमध्ये आयटी पार्कसमोरील रस्त्यालगत असणाऱया नाल्याची भिंत कोसळून रस्ता खचल्याची घटना घडली होती. त्यामुळे निर्माण झालेल्या धोक्याची गंभीर दखल घेत शिवसेना विभागप्रमुख, आमदार सुनील प्रभू यांच्या प्रमुख उपस्थितीत पालिकेचे पायाभूत सुविधा उपायुक्त उल्हास महाले यांच्यासोबत वरळी इंजिनीयरिंग हब येथे आज बैठक पार पडली. या वेळी संबंधित नाल्यांना आरसीसी संरक्षक भिंत बांधण्यासाठी तातडीने निविदा प्रक्रिया राबवण्यात येईल, असे आश्वासन पालिका प्रशासनाकडून देण्यात आले. या वेळी माजी महापौर ऍड. सुहास वाडकर, माजी नगरसेवक तुळशीराम शिंदे, मुख्य अभियंता (एसडब्ल्यूडी) जहागीरदार, संजय बोरसे, नंदकिशोर पाटील, नागरी निवारा परिषद संस्थेचे अमित नेवरेकर, विनायक जोशी, मुकुंद सावंत यांच्यासह स्थानिक रहिवाशी उपस्थित होते.