
नुकसान झालेल्या शेतीचे पंचनामे केवळ कायद्यात लिहिले आहेत म्हणून केले जात आहेत. त्यात शेतकऱयाला अडकवून ठेवण्याची सरकारची इच्छा नाही. पावसाअभावी पिकांचे नुकसान झाल्याचे दिसत आहे. येत्या दोन दिवसांत दुष्काळाबाबतचा शासन निर्णय काढला जाईल. शेतकऱयांना सरसकट मदत केली जाईल, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज जाहीर केले.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज दुष्काळी भागाचा दौरा केला. मराठवाडय़ातील लातूर, धाराशीव तसेच सोलापूर जिह्यातील शेतकऱयांच्या बांधावर जाऊन मुख्यमंत्र्यांनी प्रत्यक्ष परिस्थितीची पाहणी करून दुष्काळग्रस्त शेतकऱयांशी संवाद साधला. लातूर जिह्यातील खरोसा येथे भेट दिल्यानंतर माध्यमांशी बोलताना देवेंद्र फडणवीस म्हणाले की, केवळ खरीपच नव्हे तर रब्बीचे नुकसान गृहीत धरून सरकार शेतकऱयांच्या पाठीशी उभे राहील.
शेतकऱ्यांची तपासणी, शिवसेना आमदारांना अडवले
मलकापूर येथे मुख्यमंत्र्यांसमोर व्यथा मांडण्यासाठी आलेल्या शेतकऱयांना मेटल डिटेक्टरमध्ये तपासणी करून सोडण्यात आले. त्यानंतर शेतकऱयांना एक भलामोठा दोरखंड लावून त्यामागे जखडून ठेवण्यात आले. शिवसेना आमदार पैलास पाटील आणि डॉ. प्रवीण स्वामी हे आले असता त्यांनाही शेतकऱयांबरोबरच दोरखंडाने अडवण्यात आले. यावरून दोन्ही आमदारांनी तीव्र संताप व्यक्त केला.
हुंदका अनावर
निलंगा तालुक्यातील जाऊ येथे फडणवीस यांना पीक नुकसानीची माहिती देताना नूर पटेल हे शेतकरी भावुक झाले. वाळलेली पिके पाहून त्यांना हुंदका अनावर झाला. यावेळी मुख्यमंत्र्यांनी त्यांचा हात हातात घेऊन धीर दिला.
धीर सोडू नका
लातूर जिल्ह्यातील पिकांची परिस्थिती अतिशय वाईट आहे अशा परिस्थितीत पिण्याच्या पाण्याची व जनावरांच्या चाऱयाची सोय सरकारकडून केली जाईल. काळजी करू नका आणि धीरही सोडू नका, असे आवाहन मुख्यमंत्र्यांनी केले.
राज्यात यंदा दुष्काळाची भीषणता 1972 पेक्षाही अधिक तीव्र राहण्याची शक्यता आहे. पुढील काही महिने अतिशय आव्हानात्मक असून या काळात धीर सोडू नका. संकटाचा सामना आपण सर्वांनी एकजुटीने करूया. या संकट काळात शेतकऱयांना एकटे न सोडता सरकार पूर्ण ताकदीने त्यांच्या पाठीशी उभे राहून आवश्यक ती सर्व मदत करील – देवेंद्र फडणवीस, मुख्यमंत्री































































