धनंजय मुंडे कोरोना पॉझिटीव्ह, सोशल मीडीयावरून दिली माहिती

अजित पवार गटाचे आमदार व राज्याचे मंत्री धनंजय मुंडे यांना कोरोनाची लागण झाली आहे. मुंडे यांनी स्वत: सोशल मीडियावरून याबाबत माहिती दिली. गेल्या चार दिवसांपासून त्यांनी स्वत:ला क्वारंटाईन केले आहे.

”नागपूर अधिवेशन संपल्यानंतर अस्वस्थ वाटू लागल्याने मी तपासणी केली असता पुन्हा एकदा कोविड पॉझिटिव्ह असल्याचे आढळून आले. मला सध्या फारसा त्रास नाही, मात्र डॉक्टरांच्या सल्ल्याने मागील 4 दिवसांपासून क्वारंटाईन राहून योग्य उपचार घेत आहे. काळजी करण्याचे कोणतेही कारण नाही.मी लवकरच बरा होऊन आपल्या सर्वांच्या सेवेत पुन्हा दाखल होईल’, असे त्यांनी पोस्ट केले आहे.

तसेच ”सध्या थंडीचे वातावरण असून कोविडच्या नव्या आवृत्तीने शिरकाव केला आहे. त्यादृष्टीने घाबरून न जाता सर्वांनी आरोग्याची योग्य ती काळजी घ्यावी’, असे आवाहनही त्यांनी या पोस्टमधून केले आहे.