
भारतीय जनता पक्षाच्या नेतृत्वात असलेल्या धुळे जिल्हा परिषदेत वर्षभरातच एक कोटीच्या आसपास गैरव्यवहार झाला आहे. विशेष म्हणजे मर्जीतल्या लोकांची निवड करून चौकशी समिती नेमली आणि चौकशी समितीने गैरव्यवहार झाला नाही असा अहवाल दिला हे सारे गंभीर आहे. त्यामुळे आता राज्य सरकारने विशेष चौकशी समितीमार्फत जिल्हा परिषदेच्या गैरव्यवहाराची चौकशी करावी, अशी मागणी शिवसेना सदस्य सुनीता सोनवणे यांनी केली. प्रशासन प्रमुख असलेल्या मुख्य कार्यकारी अधिकारी वान्मती सी. भ्रष्टाचाराला साथ देत आहेत, असे म्हणत सोनवणे यांनी वान्मती सी. यांच्या दालनासमोर ठाण मांडले. अधिकाऱयांना भ्रष्टाचार दिसत नसल्याने सोनवणे यांनी डोळय़ावर काळी पट्टी बांधली होती.
धुळे जिल्हा परिषदेची 1962 मध्ये स्थापना झाल्यानंतर पहिल्यांदाच जिल्हा परिषदेची सत्ता भारतीय जनता पक्षाच्या हाती गेली. परंतु केवळ वर्षभराच्या आत जिल्हा परिषदेचे काम मनमानी पद्धतीने चालवून एक कोटी रुपयांचा गैरव्यवहार झाला आहे असा आरोप शिवसेना सदस्या सुनीता सोनवणे यांनी केला आहे. शिंदखेडा आणि शिरपूर तालुक्यातील कामांचे पुरावेच सोनवणे यांनी दिले.
सत्ताधारी स्वतःच्या मुलांना कामे देत आहेत. निरनिराळी कामे मर्जीतल्या ठेकेदारांना दिली जात आहेत. प्रत्यक्षात वीस टक्के काम झालेले असताना शंभर टक्के पैसे काढून घेतले जातात. या बाबी तितक्याच खऱया आहेत, परंतु स्थानिक चौकशी समितीला भ्रष्टाचार दिसला नाही. त्यामुळे आता जिल्हा परिषदेतील भ्रष्टाचाराची चौकशी करण्यासाठी राज्य सरकारने विशेष समिती नेमावी, अशी मागणी आपण करणार असल्याचे सुनीता सोनवणे आणि शाहना सोनवणे यांनी सांगितले. प्रशासन प्रमुख असलेल्या वान्मती सी. भ्रष्टाचाराला पाठबळ देत आहेत, असा आरोप करीत सुनीता सोनवणे यांनी वान्मती सी. यांच्या दालनासमोर गुरुवारी ठाण मांडले.































































