
कुत्रा चावल्यानंतर रेबीजचं इंजेक्शन दिले जातं. पण, एका आरोग्य कर्मचाऱ्याने कुत्रा चावलेल्या व्यक्तिला चक्क कोरोनाची लस टोचली आहे.
ही घटना झारखंडच्या पलामू जिल्ह्यात घडली आहे. येथील पाटन आरोग्य केंद्रात राजू नावाचा एक माणूस कुत्रा चावल्याची तक्रार घेऊन आला होता. तिथे उपस्थित एका आरोग्य कर्मचाऱ्याला त्याने अँटी रेबीज इंजेक्शन देण्याची विनंती केली.
पण, त्या कर्मचाऱ्याने राजूला कोरोनाची लस दिली. विशेष म्हणजे राजू यांच्या कोरोनाच्या दोन्ही लसी आधीच झाल्या आहेत. पण, कर्मचाऱ्याने निष्काळजीपणाने ही तिसरी लस त्यांना टोचली.
झारखंडच्या आरोग्य विभागाने तीन सदस्यीय समिती स्थापन केली असून या प्रकरणाची चौकशी केली जाणार आहे. या समितीच्या अहवालानंतर संबंधित कर्मचाऱ्यावर कारवाई केली जाणार आहे.




























































