
सामना प्रतिनिधी, मुंबई
आंतरराष्ट्रीय ख्यातीच्या मानसोपचारतज्ञ डॉ. शुभांगी पारकर यांना ‘सकाळ वुमन इम्पॅक्ट पुरस्कारा’ने सन्मानित करण्यात आले. महिला दिनानिमित्त मुंबईत झालेल्या एका शानदार सोहळ्यात हा पुरस्कार त्यांना प्रदान करण्यात आला. विविध क्षेत्रांत देदीप्यमान कामगिरी करणाऱया महिलांना या पुरस्काराने सन्मानित करण्यात येते.
केईएम रुग्णालयाच्या मानसोपचार विभागाच्या प्रमुख डॉ. शुभांगी पारकर यांनी मानसोपचार क्षेत्रात केलेल्या उल्लेखनीय कामगिरीबद्दल त्यांना या पुरस्काराने गौरविण्यात आले. मानसोपचार क्षेत्रात काम करताना प्रत्येक व्यक्तीचे वेगवेगळे स्वभाव समजून घेणे हे एक कौशल्य होते. त्यांना बोलते करून त्यांची समस्या जाणून त्यानुसार उपचार करणे हे मानसोपचारतज्ञाचे कसब आहे. हे कसब पणाला लावतानाच ते विद्यार्थ्यांमध्ये उतरविण्यासाठीही मी प्रयत्न केले. आज केईएम रुग्णालयांतून अनेक यशस्वी मानसोपचारतज्ञ घडत आहेत, अशी प्रतिक्रिया डॉ. शुभांगी पारकर यांनी व्यक्त केली.




























































