मुंढव्यातील हॉटेलमध्ये पोलिसांचा दारूच्या नशेत राडा, तिघा पोलीस कर्मचार्‍यांवर गुन्हा दाखल

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

मुंढव्यातील हॉटेल मेट्रो लाऊंजमध्ये दारूच्या नशेत पुणे शहर पोलीस दलातील तिघा पोलीस कर्मचार्‍यांनी राडा घातल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. सोमवारी मध्यरात्री ही घटना घडली. दारू पिल्यानंतरही आणखी दारूची मागणी करून येथील कर्मचार्‍याला तिघांनी मारहाण केली. याप्रकरणी मुंढवा पोलीस ठाण्यात मारहाण तसेच मुंबई दारूबंदी अधिनियमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

अंमलदार उमेश मरीस्वामी मठपती (वय – 29, रा. सोमवार पेठ), अमित सुरेश जाधव (वय – 37, रा. भवानी पेठ) आणि योगेश भगवान गायकवाड (वय – 23, रा. केशवनगर) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. याबाबत कुनाल दशरथ मद्रे (वय – 27, रा. घोरपडीगाव) यांनी फिर्याद दिली आहे.

मठपती हे फरासखाना पोलीस ठाण्यात, जाधव हे समर्थ वाहतूक विभाग आणि गायकवाड हे चंदननगर पोलीस ठाण्यात कर्तव्यावर आहेत. तर, फिर्यादी मद्रे हे मेट्रो लाऊंज हॉटेलमध्ये मॅनेजर आहेत. मद्रे यांचे घोरपडीगावात मेट्रो लाऊंज नावाचे हॉटेल आहे. सोमवारी (21 नोव्हेंबर) रात्री सव्वा एक वाजता मद्रे हॉटेल बंद करून आवरा आवरीचे काम करीत होते. त्यावेळी पोलीस अंमलदार उमेश मठपती, अमित जाधव आणि योगेश गायकवाड हे हॉटेलमध्ये आले. त्यांनी बार काऊन्टरवर दारू पिली. यानंतर आणखी दारूची मागणी केली. तसेच, शिवीगाळ करीत येथील रोहित काटकर याला हाताने मारहाण केली. एवढेच नाही तर मोठमोठ्या आवाजात धमकी देऊन हॉटेलमधील बार काऊंटरवर धिंगाना घातला.

घटनेची माहिती मिळताच मुंढवा पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक अजित लकडे, पोलिस निरीक्षक (गुन्हे) प्रदिप काकडे यांच्यासह अधिकारी, कर्मचार्‍यांनी घटनास्थळी भेट दिली. यानंतर तिघांवर मुंढवा पोलीस ठाण्यात मारहाण आणि मुंबई दारूबंदी अधिनियमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकारामुळे पोलीस दलात खळबळ उडाली आहे.