मोदींचा ड्रीम प्रोजेक्ट बुलेट ट्रेनला गुजरातमध्येच खोडा, रेल्वेच्या दोन विभागांमधील विवादामुळे प्रकल्प खोळंबला

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा ड्रीम प्रोजेक्ट असलेल्या बुलेट ट्रेन प्रकल्पासाठी 100 टक्के भूसंपादन झाल्याचे गेल्याच महिन्यात मोठा गाजावाजा करत सांगण्यात आले. परंतु या प्रकल्पाला गुजरातमध्येच खोडा बसल्याचे उघड झाले आहे. ऑक्टोबर 2023पासून बुलेट ट्रेनचे काम बंद असून रेल्वेच्या दोन विभागांमधील विवादामुळे हा प्रकल्प खोळंबल्याची माहिती आहे.

पश्चिम रेल्वे आणि एनएचएसआरसीएल अर्थात नॅशनल हाय-स्पीड रेल्वे कॉर्पोरेशन यांच्यातील तांत्रिक मुद्दा बुलेट ट्रेनच्या मार्गातील अडसर ठरला आहे. पश्चिम रेल्वेच्या अधिकाऱयांनी एलएचएसआरसीएलला पूल उभारण्याची परवानगी देण्यात आलेली नाही. अहमदाबादमध्ये असलेले साबरमती रेल्वे स्टेशन ते कालुपूर रेल्वे स्टेशन या दोन स्थानकांदरम्यान असलेला तिसरा रेल्वे मार्ग ब्लॉक करण्याची आवश्यकता आहे. परंतु पश्चिम रेल्वेने अद्याप त्यासाठी परवानगी दिलेली नसून त्यामुळे काम पूर्णपणे बंद आहे. परिणामी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा हा ड्रीम प्रकल्प रखडण्याची चिन्हे आहेत.

मुंबई ते अहमदाबाद 2 तास

मुंबई ते अहमदाबाद मार्गावर अत्याधुनिक सुविधांसह सज्ज अशी बुलेट ट्रेन धावणार आहे. जपान सरकारच्या तांत्रिक आणि आर्थिक सहाय्याने हा प्रकल्प उभा राहत असून हा प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर मुंबई आणि अहमदाबाद ही दोन मोठी शहरे 2.07 तासांच्या अंतराने जोडली जातील. ही बुलेट ट्रेन तब्बल ताशी 350 कि.मी. वेगाने धावणार आहे.

– बुलेट ट्रेनच्या 508 किलोमीटरच्या मार्गात समुद्राखालील मार्गाचा आणि बोगद्यांचाही समावेश आहे. या प्रकल्पासाठी अंदाजे 1,08,000 कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे.

– वांद्रे-कुर्ला संकुल ते शीळफाटा बोगदा हा 21 कि.मी.चा असणार आहे. त्यापैकी 7 कि.मी. लांबीचा देशातील पहिला समुद्राखालील बोगदा ठरणार आहे.

– 8 जानेवारी 2024पर्यंत महाराष्ट्र, गुजरात, दादरा नगर हवेली येथील बुलेट ट्रेन प्रकल्पासाठी 1,389.49 हेक्टर जागेचे संपादन करण्यात आले आहे.