मुंबईची श्रीमंती

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

>> द्वारकानाथ संझगिरी

उंच टॉवरवरून एखाद्या शहराचं दर्शन घेणं ही जगभरातली अत्यंत आवडती गोष्ट आहे. जे शहर डोंगराला टेकून बसलंय, तिथं डोंगरावरून शहराचं विहंगम दृश्य दिसतं. जगभरात अशा जागा मुद्दामहून तयार केल्या जातात.

लहानपणी इंग्लिश चित्रपट पाहिल्यामुळे न्यूयॉर्कच्या शंभर मजली एम्पायर स्टेटचं मला प्रचंड कौतुक होतं. पुढे माझा एक मित्र उच्च शिक्षणासाठी अमेरिकेत गेला. त्या काळी घरटी एक मुलगा अमेरिकेत शिकत नव्हता. त्याचं एका मुंबईतल्या मुलीवर प्रेम होतं. त्याला ते व्यक्त करणं जमत नव्हतं. त्याने एकदा मला पत्र पाठवून सांगितलं, ‘‘तिला कळवं, माझं तिच्यावरचं प्रेम शिअर्स टॉवरपेक्षा जास्त उंच आहे.’’ त्यावेळी त्याच्या प्रेमापेक्षा शिअर्स टॉवर किती उंच असेल या विचारातच मी गुंतून गेलो. पुढे तिला आभाळाएवढं प्रेम उंच असणारा कुणीतरी भेटला आणि शिअर्स टॉवर बुटका वाटायला लागला. तिने माझ्या मित्राचा शिअर्स टॉवर नाकारला, पण माझी शिअर्स टॉवरबद्दलची उत्सुकता अधिकच वाढली. मी शिकागोला गेल्यावर माझ्या मित्राला सांगितलं, ‘‘मला आधी शिअर्स टॉवर दाखव.’’ आज शिअर्स टॉवर जगातला सर्वात उंच टॉवर राहिलेला नाही. दुबईच्या बुर्ज खलिफाने त्याला कधीच ‘बुटका’ केलंय.

त्या एम्पायर स्टेट इमारतीपासून ते थेट बुर्ज खलिफापर्यंत मी ज्या ज्या शहरांत गेलो तिथे वर जाऊन मी शहरं पाहिली. गलिव्हरच्या डोळ्यांतून पिग्मी कसे दिसत असतील हे मला जाणवलं. मग तो टोरॅण्टोचा सीएन टॉवर असो, सीएन टॉवरची काचेची जमीन आहे. त्यावर पाय ठेवताना मनात होणारी धाकधूक, खाली दिसणारी काडेपेटीची घरं, इवल्याशा गाडय़ा पाहताना धडधडत्या छातीने आनंद घेणे म्हणजे काय ते कळतं. छाती धडधडते. कारण ‘काच तुटणार नाही ना’ ही भीती उगाचच मनात असते. त्यावर नाचलं तरी काही होत नाही, पण काच ही तडा जाणारी गोष्ट मनावर एवढी बिंबलेली असते की, ती नकळत धडधड वाढवते. आता नव्याने उभा राहणाऱ्या प्रत्येक टॉवरमध्ये काच ही जमिनीसारखी बसवलेली दिसते. अमेरिकेने तो प्रयोग ग्रॅण्ड कॅनियनलासुद्धा केलाय.

या जगभरातल्या टॉवर्सच्या वैशिष्ट्यांबद्दल पुढे लिहीनच, पण जग फिरून आल्यावर मला जाणवलं की, मलबार हिलवरून जी माझी मुंबई दिसते दुपारी, संध्याकाळी किंवा रात्रीच्या वेळी, त्याला जगात कुठे तोड नाही. तिथून दिसणारा राणीचा रत्नहार हा सर्वात रत्नजडित हार आहे आणि आपण तिथे जगभरातल्या पर्यटकांची गर्दी उसळावी असं खरंच काहीही करीत नाही. आपल्याकडे ‘कोहिनूर’ आला ना, तरी तो आपल्याला विकता येणार नाही. कारण पर्यटन विकणे याला आपण शून्य किंमत देतो. त्यासाठी त्याने हजारो कोटी खर्च करून काही निर्माण करायची गरज नाही. आहेत ती रत्नं विकली तरी आपण मालामाल होऊ.

मलबार हिलचा विचार करा. तुम्हाला आवडो न आवडो, मलबार हिल आपल्याला ब्रिटिशांनी ‘उभारून’ दिलं. आज मलबार हिल जगातली एक महागडी वस्ती आहे. अनेक मोठमोठे उद्योगपती इथे राहतात. गोदरेज, जिंदाल, रुईया वगैरे. अनेक इतर क्षेत्रांतली बडी बडी मंडळी तिथे राहतात. त्याची सुरुवात 1819 मध्ये माऊंट स्टुअर्ट एल्फिन्स्टनने केली. तो मुंबईचा गव्हर्नर होता. त्याने त्याचा बंगला या डोंगरावर बांधला. आता तिथे राज्यपालांची आलिशान वास्तू आहे. मुख्यमंत्री आणि मंत्र्यांचे बंगले आहेत. मुंबईकरांची तहान भागवायला मोठी टाकी (रिझरव्हॉयर) त्यांनीच बांधली. बाजूला पारशांची स्मशानभूमी आहे. तिथून सांडपाणी या टाकीच्या वरच्या भागातून झिरपायचं म्हणून त्यावर गार्डन उभारलं गेलं 1881 साली. त्याचा आर्किटेक्ट होता उल्हास घापोकर, एक मराठी माणूस! त्यावेळी मुंबई मराठी माणसांची होती. आता ती कागदोपत्री मराठी माणसांची आहे. तिथे पहिली बससेवा दुसऱ्या महायुद्धात सुरू केली ब्रिटिशांनी.

आपण काय केलं? आपण तिथे उंच उंच इमारती बांधल्या. मलबार हिलची श्रीमंती वाढवली, पण तिथून मुंबईची ‘श्रीमंती’ दिसण्यासाठी आपण काय केलं? वरच्या ब्रिटिशांनी बांधलेल्या बागेतून समोरचा राणीचा कंठहार दिसतो. रात्रीच्या वेळी तो खऱ्या अर्थाने कंठहार वाटतो. तिथे एक वर पूर्वी ‘नाझ’ नावाचं रेस्टॉरण्ट होतं. तिथून मुंबई काय दिसायची! तिथे बिअर मिळायची. परदेशाहून कुणी आला की, त्यांना मुंबई दाखवायला मी तिथे घेऊन जायचो. बऱ्याचदा तो राणीचा कंठहार आठवला की, घरच्या राणीला तिथे घेऊन जायचो. मुंबईत स्वच्छ हवा काय असते याचं फुप्फुसाला प्रात्यक्षिक दाखवायला ती जागा उत्तम होती. मुंबईत झाडांचं अस्तित्व जाणवावं अशा जागा आता संपत चालल्या आहेत. एकदा गोरेगावच्या आरे कॉलनीत मेट्रो शेड टाकली की, मुंबईतली झाडे नष्ट करायचं कार्य पूर्ण होईल. मेट्रोचं काम संपलं की, तिथं ‘गरीबां’साठी घरं उभारली जातील आणि बिल्डर आणि राजकारणी गब्बर होतील. असो, तर काय सांगत होतो की, मलबार हिलच्या ‘नाझ’मध्ये बसण्यातला आनंद वेगळाच होता. तिथे एखादा टॉवर, त्यावर गॅलरी, एखादं मध्यमवर्गीय माणसाला परवडेल असं रेस्टॉरण्ट का उभारू नये? किंवा ‘लंडन आय’सारखं एखादं चक्र. तिथून 360 कोनातून मुंबई दिसेल. फक्त कंठहार नाही, तर मागच्या समुद्रसेतूपासून गेटवे ऑफ इंडिया, पूर्व किनारा वगैरे वगैरे आणि त्यासाठी तीन हजार कोटींची गरज नाही. मलबार हिलच्या श्रीमंतांनी थोडे थोडे पैसे टाकले तरी उभा राहील तो टॉवर. नाहीतरी तिथून जवळच एका कुटुंबासाठी शंभर दशलक्ष डॉलर्सची इमारत उभी आहे. मुंबईत अशी मंडळी आहेत की, त्यांनी खिसे झटकले तरी असा टॉवर उभा राहू शकतो आणि हो, टॉवरसाठी जगातल्या कुठल्याही टॉवरशी स्पर्धा करायची गरज नाही. ‘बुर्ज खलिफा’ सर्वात उंच म्हणून आपण दोन अंगुळं जास्त वगैरे गरज नाही. मुंबई 360 कोनात दिसली की झाले. नाव कुणाचंही द्या. कारण आपल्यापुढे नाव हा महत्त्वाचा मुद्दा असतो.

पहा पटतंय का? मग युरोपातला कुणी तरी आपल्या प्रेयसीला लिहिलं, ‘माझं प्रेम मुंबईच्या त्या टॉवरपेक्षा उंच, तिथून दिसणाऱ्या दृश्यापेक्षा विशाल आहे.’ जागा आहे, पैसे आहेत, इच्छाशक्ती हवी.

Email: [email protected]