
सामना प्रतिनिधी । संभाजीनगर
खऱ्या भुकेची वेळ ओळखून दोनदाच जेवा, दोन जेवणांमध्ये काहीही खाऊ-नका. शक्यतो गोड न खाता प्रथिनांचे प्रमाण वाढवा आणि ४५ मिनिटांत साडेचार किलोमीटर चालत रहा. स्थूलपणा निर्विवादपणे कमी होतो आणि याचा अनुभव माझ्यासह अनेकांनी घेतला आहे. अर्थातच स्थूलपणा कमी झाल्यास मधुमेह, रक्तदाब, हृदयविकार निश्चितपणे कमी होऊ शकतो, असा मंत्र डॉ. जगन्नाथ दीक्षित यांनी आज गुरुवारी दिला.
देवगिरी अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या विश्वकर्मा सभागृहात आज रेअर शेअर कार्यक्रमात ते बोलत होते. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. उल्हास शिऊरकर, डॉ. प्रवीण सूर्यवंशी, सी. पी. त्रिपाठी, शेख सलीम यांची उपस्थिती होती.
डॉ. दीक्षित पुढे म्हणाले, पूर्वी माणूस जंगलात रहात असत. आपल्या शरीराची रचना ही उपाशी राहण्यासाठी आहे. परंतु वाढती स्पर्धा आणि धावपळीच्या जीवनशैलीमुळे मधुमेह होतो. जीवनशैली सुधारली तर मधुमेहमुक्त जीवन जगता येते. परंतु आपल्याकडे डॉक्टर तसे सांगत नाहीत. परंतु आता संशोधन आणि योग्य जीवनशैलीमुळे हे शक्य होत असल्याने डॉक्टरदेखील मधुमेह रिव्हर्ट होत असल्याचे सांगू लागले आहेत. आम्ही करत असलेल्या प्रयत्नांमुळे आणि जनजागृतीमुळे अनेकांच्या दुकानदाऱ्या बंद झाल्या आहेत. खरं तर वजन वाढण्याच्या प्रक्रियेसाठी इन्सुलिन हे संप्रेरक जबाबदार ठरते. काहीही व कितीही खाण्यानंतर १८ ते ३२ युनिट इन्सुलीन नैसर्गिकरीत्या स्त्रवते व एखाद्या तासानंतर जेव्हा-जेव्हा काहीही खाणे-पिणे होते, तेव्हा पुन्हा तेवढेच इन्सुलीन स्त्रवते. अशा रितीने दिवसभरात अनेकदा खाण्या-पिण्यातून अतिरिक्त इन्सुलीनची निर्मिती होऊन तेच सगळ्या समस्येचे मूळ ठरते. हे दृष्टचक्र मोडण्यासाठीच पाण्याशिवाय दोन जेवणात शक्यतो काहीही न खाण्याचे तत्त्व म्हत्त्वाचे ठरते. ते शक्य नसल्यास काही प्रमाणात ताक, बिनसाखरेचा चहा, नारळ पाणी, टोमॅटोच्या दोन फोडी चालू शकतील. अर्थात, हा प्रयोग मधुमेहींसाठी नव्हे तर मधुमेह पूर्वस्थितीत किंवा एखाद्या वर्षापासून मधुमेह जडलेल्यांसाठी व १८ वर्षांवरील व्यक्तींसाठी उपयुक्त ठरतो. हा प्रयोग मधुमेह उपाचारांमधील क्रांती आहे. तेंव्हा मोबाईलवर नव्हे तर मैदानावर जावून खेळा, असा सल्लाही डॉ. दीक्षित यांनी दिला.
























































