चौकशीला आलो नाही म्हणून ईडी अटक करू शकत नाही! अटक बेकायदा असल्याचा केजरीवाल यांचा पुनरुच्चार

कथित मद्य धोरण घोटाळ्याप्रकरणी चौकशीला हजर राहण्यासाठी ईडीने नोटीस बजावली होती. त्याकडे तुम्ही दुर्लक्ष का केले, असा सवाल आज सर्वोच्च न्यायालयाने दिल्लीचे मुख्यमंत्री आणि आपचे राष्ट्रीय संयोजक अरविंद केजरीवाल यांना केला. यावर चौकशीला आलो नाही म्हणून ईडी मला अटक करू शकत नाही. ईडी चौकशीला हजर न राहण्याबद्दल कायद्याने मला अधिकार दिला आहे, ही बाब केजरीवाल यांची बाजू मांडणाऱया ज्येष्ठ वकील अभिषेक मनू सिंघवी यांनी न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिली. सलग तासभर सिंघवी यांनी केजरीवाल यांच्या वतीने युक्तिवाद केला. यावर तुम्हाला बाजू मांडण्यासाठी किती वेळ पाहिजे, असा सवाल करत न्यायालयाने केजरीवाल यांच्या ईडी अटकेला आव्हान देणाऱया याचिकेवर 30 एप्रिल रोजी सुनावणी करण्यात येईल, असे सांगितले.

केजरीवाल हे ईडीकडून झालेली अटक आणि ईडी कोठडी याच्याविरोधात आहेत. मग त्यांनी जामिनासाठी याचिका का दाखल केली नाही, असा सवाल सर्वोच्च न्यायालयाने केला. यावर ईडीने केलेली अटकच बेकायदा होती, असे अभिषेक मनू सिंघवी म्हणाले. दुपारी 2 वाजून 55 मिनिटांनी केजरीवाल यांच्या आव्हान याचिकेवर सर्वोच्च न्यायालयात सुनावणी सुरू झाली. ज्येष्ठ वकील अभिषेक मनू सिंघवी यांनी केजरीवाल यांची बाजू मांडली, तर ईडीच्या वतीने महाधिवक्ता एस.व्ही. राजू यांनी युक्तिवाद केला.

अनेक जबाबांमध्ये केजरीवालांचे नाव नाही

अनेक जबाबांमध्ये केजरीवाल यांचे नाव घेण्यात आले नाही. कुठल्याही प्रकारचे नवीन दस्तावेज समोर आले नाहीत. कलम 50 अंतर्गत नेंदवल्या गेलेल्या जबाबांमध्येही केजरीवाल यांचे नाव नव्हते. केवळ बीएसआर रेड्डी यांनी इलोक्टोरल बॉण्ड खरेदी केले होते. त्यांनी 17 जबाब दिले. त्यात एप्रिलमध्ये माझे नाव घेण्यात आले होते. तर शरथ रेड्डीने 9 जबाबांमध्ये माझे नाव घेतले नव्हते. ईडीने जबाब निवडून घेतले आणि त्याआधारे कारवाई केली. परंतु ईडीने शरथ रेड्डीच्या 10व्या जबाबावर विश्वास ठेवण्याचे कारण सांगितले का, असा सवाल केजरीवाल यांनी केला.

केजरीवालांचा युक्तिवाद काय…

सीबीआयने केजरीवाल यांना चौकशीसाठी बोलावले होते. त्या वेळी केजरीवाल यांनी ईडीच्या नोटिशीला सविस्तर उत्तर दिले होते. जर चौकशीला आलो नाही तर ईडी असे म्हणू शकत नाही की केजरीवाल हजर राहिले नाहीत म्हणून त्यांना अटक केली.

चौकशीला हजर न राहण्याचा कायद्याने मला अधिकार दिला आहे, असे केजरीवाल म्हणाले. तसेच जर मी जबाब दिला नाही तर सहकार्य करत नाही म्हणून अटक करत आहोत असे ईडी म्हणू शकते का, असा सवालही केजरीवाल यांची बाजू मांडणाऱया सिंघवी यांनी केला.

कलम 50 अंतर्गत जे जबाब नोंदवले गेले त्यातून कुठलाही पुरावा ईडीला मिळाला नाही. दीड वर्ष मला अटक करण्यात आली नाही. माझा जामीन अर्ज फेटाळल्याचे कारण देत ईडी घरी येऊन मला अटक करू शकत नाही, याकडे केजरीवाल यांनी न्यायालयाचे लक्ष वेधले.

दिल्ली सरकारचे काम सुरळीत चालू द्या

मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल तुरुंगात असल्याने दिल्ली सरकारचे वीज आणि पाण्यावरील अनुदान आणि महिलांचा बसमधून होणारा मोफत प्रवास बंद होणार असल्याच्या बातम्या समोर येत होत्या; परंतु या अफवा असून महिलांचा प्रवास बंद होणार नाही, सर्व योजना सुरळीत सुरू राहतील, असे केजरीवाल यांनी म्हटले आहे. तसेच माझी काळजी करू नका. दिल्ली सरकारचे काम सुरळीत चालू द्या, असेही त्यांनी सांगितले. मंत्री अतिशी यांनी आज केजरीवाल यांची भेट घेतली. या भेटीनंतर अतिशी प्रसारमाध्यमांशी बोलताना म्हणाल्या, केजरीवाल यांना तब्येतीबद्दल विचारले असता ते म्हणाले, माझी काळजी करू नका, दिल्ली सरकारचे काम कसे चाललेय ते सांगा. शाळेतल्या मुलांना वेळेवर पुस्तके मिळताहेत का? अनेक ठिकाणांहून तक्रारी येत होत्या की, मोहल्ला क्लिनिकमध्ये पुरेशी औषधे नाहीत. ती समस्या सोडवली का? मी लवकरच तुरुंगाबाहेर येईन आणि दिल्लीतील महिलांना दर महिन्याला 1 हजार रुपये देण्याचे वचन पूर्ण करीन असा संदेश केजरीवाल यांनी दिल्याचे अतिशी यांनी सांगितले.