बोली भाषेतून मराठी अध्यापन!

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

>> विजय जोशी

मराठी भाषेची गोडी बोलीभाषेत संस्कारित करून मराठीची आवड विद्यार्थ्यात रुजविणारे शिवाजी अंबुलगेकर त्या अर्थाने मराठीचे ऍम्बेसॅडरच म्हणावे लागतील. आदिवासी, बंजारा, कानडी, अहिराणी या बोली भाषा असलेल्या विद्यार्थ्यांना मराठी भाषेची गोडी लागावी यासाठी त्या त्या बोली भाषेतून मराठीचे अध्यापन करण्याचा शिवाजी अंबुलगेकर या शिक्षकाचा अभिनव प्रयोग मराठी भाषेच्या विकासासाठी निश्चितच फलदायी ठरू शकेल.

मराठवाडय़ातील मुखेड तालुक्यातील कळमेवाडी हे छोटेसे गाव. साधारण दोन ते अडीच हजारांची लोकवस्ती… त्या ठिकाणी असलेली विद्या निकेतन ही छोटीशी शाळा… या शाळेत शिकणारे विविध समाजाचे विद्यार्थी… या विद्यार्थ्यांना मराठी येत नसल्याने मराठी भाषा शिकवायची कशी, हा तेथील शिक्षक शिवाजी तुळशीराम अंबुलगेकर यांना पडलेला पेच आणि त्यातून त्यांनी काढलेला मार्ग… ही सगळीच शालेय मराठी अध्यापनाच्या क्षेत्रातील एका अवलिया शिक्षकाच्या अभिनव प्रयोगाची कहाणी आहे. ती जेवढी अफलातून आहे तेवढीच ग्रामीण भागातील मराठीच्या शिक्षकांना प्रेरणा देणारी आहे. कंधार तालुक्यातील अंबुलगा येथे जन्मलेल्या शिवाजी तुळशीराम अंबुलगेकर यांनी एम.ए. मराठी व बी.एड. केले. नांदेड जिल्हय़ातील गोरमाटींच्या बंजारा लोकगीतांचा सध्या ते अभ्यास करत आहेत.

कळमेवाडी येथील विद्यानिकेतन पब्लिक स्कूलमध्ये ते शिक्षक आहेत. शिक्षक म्हणून दैनंदिन कर्तव्यपूर्ती आणि इतर सोपस्कार सुरू असले तरी शाळेतील विशेषतः बंजारा समाजाच्या विद्यार्थ्यांना मराठी शिकविताना येणारी भाषेची अडचण त्यांना अस्वस्थ करीत होती. त्यातून काय मार्ग काढायचा हा प्रश्न त्यांच्यासमोर होता. त्यावर उत्तर म्हणून त्यांनी मराठी कवींच्या कविता विद्यार्थ्यांच्याच बोलीभाषेत समजावून सांगण्याचा प्रयत्न केला. शाळेत शिकणारे बरेच विद्यार्थी बंजारा समाजाचे होते. त्याशिवाय अहिराणी, कानडी, वडारी भाषिक विद्यार्थीही होते. या विद्यार्थ्यांसाठी मराठी कविता त्यांच्या बोलीभाषांमधून अनुवादित करण्याचा संकल्प अंबुलगेकर यांनी केला. पुन्हा हे अनुवाद विद्यार्थ्यांकडूनच करून घेतले आणि त्यांच्या बोलीभाषेतून कवितांचा अर्थ त्यांना समजावून सांगितला. तेवढय़ावरच न थांबता विद्यार्थ्यांकडून कवितांचा मतितार्थ वदवून घेतला. मराठी चित्रपटातील या कवींची काही गाणीही आपापल्या बोलीभाषेत चालीवर म्हणायला लावली. बोलीभाषेतून असल्यामुळे विद्यार्थ्यांना अंबुलगेकर सरांची ही ‘शिकवणी’ खूपच सोपी गेली. कारण मराठी भाषाच ज्यांना नवीन होती त्यांना मराठीचे व्याकरण आणि इतर गोष्टी या खूपच दूरच्या होत्या. त्यामुळे आधी मराठी भाषेतील अभ्यासक्रम डोक्यावरून जात असे.

मात्र अंबुलगेकर सरांच्या अभिनव प्रयोगामुळे विद्यार्थ्यांना बोलीभाषेत सुलभ पद्धतीने मराठी समजू लागली. साहजिकच विद्यार्थ्यांची गुणवत्ताही वाढली. मराठी भाषेविषयी त्यांचा ओढा वाढला. अभ्यास वाढला. दुसरीकडे शिक्षकांची विवंचनाही कमी झाली. अंबुलगेकर तेवढय़ावरच थांबले नाहीत. इतरही अनेक गोष्टी त्यांच्या डोक्यात घोळत होत्या. कारण शाळेतील या विद्यार्थ्यांना मराठी भाषेबरोबरच अभ्यासाची आणि वाचनाचीदेखील गोडी लागावी हा त्यांचा ध्यास होता. शाळेतील विद्यार्थ्यांमध्ये वाचन संस्कृती रुजावी यासाठी अंबुलगेकर यांनी ‘श्रावण अभिवाचन संस्कार’ हा प्रयोग सुरू केला. सुरुवातीला अवघड असलेला विषय विद्यार्थ्यांच्या डोक्यावरून जाऊ लागला. त्यामुळे त्यांनी विद्यार्थ्यांना आवडतील आणि त्यांच्या ज्ञानात भर पडेल अशी पुस्तके निवडली. श्यामची आई, झोंबी, शेतकऱयांचे अश्रू, माती पंख आणि आकाश आणि एपीजे अब्दुल कलाम यांचे अग्निपंख, आर. के. नारायण यांच्या ‘मालगुडी डेज’ या पुस्तकाचा अनुवाद मधुकर धर्मापुरीकर यांनी केला आहे.

याही पुस्तकाचे अभिवाचन त्यांनी विद्यार्थ्यांकडून करून घेतले. सकाळचा परिपाठ, राष्ट्रगीत आणि संविधान झाल्यावर उत्कृष्ट अभिवाचन करू शकणाऱया शिक्षक-विद्यार्थ्यांकडून त्याचे सादरीकरण करणे आणि इतर विद्यार्थ्यांनी त्याचे श्रवण करणे असा हा प्रयोग सुरू झाला. विद्यार्थ्यांचे वाचनकौशल्य विकसित करण्यासाठी प्रत्येक विद्यार्थ्याची वाचन चाचणी घेऊन त्यांना दहापैकी गुण द्यायचे. त्यांनी मिळविलेल्या गुणांच्या नोंदी लेखी स्वरूपात ठेवायच्या. शाळेतील वसतिगृहात रात्री अभ्यास संपल्यानंतर अर्धा तास प्रगत विद्यार्थ्यांची आणि अप्रगत विद्यार्थ्यांची त्यांच्याकडूनच वाचन चाचणी करून घ्यायची व झालेल्या चुका त्यांच्याकडूनच दुरुस्त करून घ्यायच्या असा हा अंबुलगेकर सरांचा प्रयोग. मराठी मातृभाषा नसणाऱया अनेक विद्यार्थ्यांना या अभिनव प्रयोगाचा चांगलाच फायदा झाला आणि मराठी भाषेविषयी त्यांचा लळा हळूहळू वाढू लागला. यासोबतच अक्षरसुधार योजना, माझ्या गावचा भूगोल, नकाशा आरेखन असे वेगवेगळे प्रयोगदेखील शिवाजी अंबुलगेकर यांनी केले. मराठी भाषेची गोडी बोलीभाषेत संस्कारित करून मराठीची आवड विद्यार्थ्यात रुजविणारे शिवाजी अंबुलगेकर त्या अर्थाने मराठीचे ऍम्बेसॅडरच म्हणावे लागतील. आदिवासी, बंजारा, कानडी, अहिराणी या भाषा अवगत असलेल्या विद्यार्थ्यांना मराठी भाषेची गोडी लावण्यासाठी अहोरात्र प्रयत्न करणाऱया शिवाजी अंबुलगेकरांचा हा प्रयोग मराठी भाषेच्या विकासासाठी व ती वृद्धिंगत करण्यासाठी निश्चितच फलदायी ठरू शकेल.

[email protected]