जिल्हा परिषद शाळेच्या गुणवत्तेला ‘सुरूंग’; शिक्षणाचा दर्जा घसरला, सिंधुदुर्ग राज्यात चौथ्या स्थानी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी । सिंधुदुर्गनगरी

सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेच्या शाळांची गुणवत्ता घसरली असल्याचे आजच्या शिक्षण समिती सभेत उघड झाले. गतवर्षी शैक्षणिक गुणवत्तेत राज्यात प्रथम असणारा सिंधुदुर्ग यावर्षी मात्र चौथ्या क्रमांकावर फेकला गेला आहे. केंद्र शासनाच्या ‘असर’ नामक एका खासगी संस्थेने केलेल्या सर्वेत हा निकाल समोर आला आहे. दरम्यान प्राथमिक शिक्षणाधिकारी एकनाथ आंबोकर यांनी याची गंभीर दखल घेऊन गुणवत्ता वाढीसाठी शिक्षकांची मानसिकता सकारात्मक करण्यासाठी येत्या काळात ‘शिक्षण परिषद’ घेणार असल्याचे सांगितले.

शिक्षण विभागाची मासिक सभा जिल्हा परिषद अध्यक्षा संजना सावंत यांच्या अध्यक्षतेखाली येथील बॅ. नाथ पै सभागृहात पार पडली. यावेळी समिती सचिव तथा शिक्षणाधिकारी एकनाथ आंबोकर, सदस्य सरोज परब, संपदा देसाई, विष्णूदास कुबल, सुनील म्हापणकर, राजेंद्र म्हापसेकर, उन्नती धुरी, यांसह गटशिक्षणाधिकारी, खातेप्रमुख उपस्थित होते.

गतवर्षी शैक्षणिक गुणवत्तेत राज्यात प्रथम क्रमांकावर असणारा आपला जिल्हा यावर्षी चौथ्या क्रमांकावर गेल्याचे शिक्षणाधिकारी एकनाथ आंबोकर यांनी सभागृहात सांगितले. ते पुढे म्हणाले, केंद्राच्या “असर” संस्थेने 2018 मध्ये गुणवत्ता विषयक सर्वे केला होता. यात गणित व वाचन या प्रमुख दोन विषयांचे मुल्यमापन करण्यात आले होते. इयत्ता तिसरी ते पाचवी मधील विद्यार्थी वाचनमध्ये राज्यात सहाव्या क्रमांकावर आहेत. तर गणितात राज्यात चौथ्या क्रमांकावर आहेत. सहावी ते आठवी मधील विद्यार्थी वाचनामध्ये तिसऱ्या तर गणितात पहिल्या क्रमांकावर आहेत, असे आंबोकर यांनी सांगितले. तर याबाबत विचार मंथन व शिक्षकांमध्ये गुणवत्ता वाढीबाबत सकारात्मकता आणण्यासाठी चालू शैक्षणिक वर्षांत शिक्षण परिषद आयोजित करणार असल्याचे ते म्हणाले.

पुढच्या वर्षी जिल्हा राज्यात अव्वल असणार
सिंधुदुर्ग जिल्हा गतवर्षी शैक्षणिक गुणवत्तेमध्ये अव्वल होता. मात्र यावर्षी तो चौथ्या क्रमांकावर राहिला आहे. ही सर्व वस्तुस्थिती विचारात घेऊन पुढच्या वर्षी सिंधुदुर्ग जिल्हा पुन्हा राज्यात अव्वल स्थानावर असेल, असा विश्वास शिक्षणाधिकारी एकनाथ आंबोकर यांनी व्यक्त केला. यासाठी सर्व प्रकारचे प्रयत्न केले जाणार असल्याचे ते म्हणाले.

सूचना देवूनही शिक्षक ऐकत नसतील तर कारवाई करणार – संजना सावंत
‘असर’ संस्थेच्या निकालानंतर सभागृहात सर्व सदस्यांनी नाराजी व्यक्त केली. तर जिल्हा परिषद अध्यक्ष संजना सावंत शाळांना अचानक भेटी देऊन शाळेत हजर नसलेल्या शिक्षकांवर कारवाई करणार असे सांगितले. यावर शिक्षणाधिकारी आंबोकर यांनी अशी विनंती केली की शाळांना आकस्मिक भेट देताना दोन ते तीन वेळा संबंधित शिक्षकांना कल्पना देवू त्यानंतर सुद्धा त्यात सुधारणा नसेल तर आपण कारवाई करा असे सांगितले.

14 लाखाच्या वाढीव बजेटला शिक्षणची मान्यता
शिक्षण समितीमध्ये आंबोकर यांनी मांडलेल्या वाढीव बजेटला सभागृहाने मान्यता दिली. वाढीव बजेट मध्ये शालेय स्पर्धेत सहभागी विद्यार्थ्यांना खेळाच्या गणवेशासह बुट देण्यात येणार आहेत. यासाठी एकून पाच लाखाचे अनुदान ठेवण्यात आले. स्पर्धे दरम्यान जखमी विद्यार्थ्यांवर वैद्यकीय खर्चासाठी दोन लाखांची तरतूद, राज्य स्तरावर सहभागी होणा-या संघासाठी 25 हजार तरतूद, स्काऊट आणि गाईड साठी पाच लाख रुपयांची तरतूद, इस्रो सहल साठी चार लाखाची तरतूद, सादील साठी पाच लाख व इतर शैक्षणिक साहित्यासाठी अनुदान असे ऐकून 14 लाखाचे वाढीव अंदाज पत्रकास मान्यता देण्यात आली.

टॅलेंट सर्च परिक्षा मार्च महिन्यात
डॉ. ए पी जे अब्दुल कलाम सिंधु टॅलेंट सर्च परीक्षा १० फेब्रुवारी रोजी घेण्यात येणार होती. मात्र परीक्षेचा सराव करण्यास वेळ मिळावा अशी मागणी शिक्षकांकडून करण्यात आल्याने ही परीक्षा मार्च महिन्याच्या पहिल्या रविवारी घेण्यात येणार आहे. तसेच या स्पर्धेत तालुक्यात अनुक्रमे प्रथम द्वितीय आणि तृतीय येणाऱ्या विद्यार्थ्यांना वैज्ञानिक सहलीत सहभागी करून घेतले जाणार असल्याची माहिती प्राथमिक शिक्षणाधिकारी एकनाथ आंबोकर यांनी सभेत दिली.

शिक्षकांनाही गणवेश लागू करा
काही शिक्षक शालेय वेळेत आठवडा बाजारात किंवा अन्य काही ठिकाणी फिरत असल्याचे दिसून येतात त्यामुळे जिल्हा परिषदच्या शिक्षकांना गणवेश लागू करावा अशी मागणी सदस्यांनी केली. गणवेश लागू केल्यास शिक्षण क्षेत्रात एकसुत्रता येईल व शालेय कालावधीत शिक्षक बाहेर गेल्यास गणवेशामुळे ठळकपणे दिसून येईल असे सदस्यांनी सांगितले. मात्र यावर शिक्षणाधिका-यांचे म्हणने जाणून घेण्याचा प्रयत्न सदस्यांनी केला असता याबाबत आपण नंतर बोलू असे शिक्षणाधिकारी आंबोकर यांनी सांगितले.