
रशिया-युक्रेनमध्ये युद्ध भडकण्याची दाट शक्यता निर्माण झाल्याच्या पार्श्वभूमीवर हिंदुस्थानी दूतावासाने युक्रेनमधील हिंदुस्थानी नागरिक आणि विद्यार्थ्यांसाठी अॅडव्हायजरी जारी केली आहे. युक्रेनमधील सध्याची तणावाची परिस्थिती पाहता येथील हिंदुस्थानी नागरिक, विद्यार्थ्यांनी तात्पुरत्या कालावधीसाठी मायदेशी परतावे, असा सल्ला दूतावासाकडून देण्यात आला आहे.
युक्रेनमध्ये हिंदुस्थानातील 20 हजारांहून अधिक विद्यार्थी अभियांत्रिकी आणि वैद्यकीय शिक्षण घेत आहेत. रशिया आणि युक्रेनमधील वाढत्या तणावाने या विद्यार्थ्यांच्या सुरक्षेची चिंता वाढवली आहे. याच अनुषंगाने युक्रेनची राजधानी किंवा येथील हिंदुस्थानी दूतावासाने मंगळवारी अॅडव्हायजरी जारी केली. हिंदुस्थानातील नागरिकांनी आवश्यक काम नसेल तर युक्रेनला जाऊ नये तसेच सध्या युक्रेनमध्ये असलेल्या हिंदुस्थानींनी गरज नसताना घराबाहेर पडू नये, असे अॅडव्हायजरीमध्ये म्हटले आहे. तसेच युक्रेनमधील हिंदुस्थानींनी आपल्या ठावठिकाण्याची माहिती दूतावासाला वेळोवेळी द्यावी, जेणेकरून संकटकाळात मदत पोहोचवता येईल. या मदतीसाठी दूतावासाचे कामकाज नियमित सुरू राहील, असेही नमूद केले आहे.
रशियाच्या सीमेजवळ दोन हजार विद्यार्थी खोळंबले
हिंदुस्थानी विद्यार्थी मायदेशी येण्यास तयार आहेत. मात्र विमान प्रवासभाडे अचानक 70 हजारांवरून दोन लाखांपर्यंत वाढवल्याने त्यांचा खोळंबा झाला आहे. हिंदुस्थानच्या सरकारनेही आमच्या सुरक्षेसाठी गंभीर पावले उचलली नसल्याचा विद्यार्थ्यांचा दावा आहे. त्यांच्या वतीने राष्ट्रपती सचिवालयातही याचिका करण्यात आली आहे. रशियाच्या सीमेपासून 35 किमीवरील खारकीव वैद्यकीय विद्यापीठात दोन हजार विद्यार्थी अडकले आहेत. सरकारविरुद्ध जाहीर बोलले तर विद्यापीठातून हाकलले जाईल, अशी भीती त्यांना आहे.




























































