लोक आत्महत्या करीत आहेत तरीही.. मटका किंग रतन खत्री ऑनलाईन!

एका जागृत तरुणीचा एक व्हिडीओ नुकताच माझ्या मोबाईलच्या व्हॉटस्ऍपवर झळकला आणि डोके सुन्न झाले. अत्यंत चिंताग्रस्त आवाजात ती तरुणी म्हणते, ‘‘हम एक ऐसे समय से गुजर रहे है, जहां यंगस्टर के रोल मॉडेल या तो उन्हें गुटखा खाने को प्रेरित कर रहे है, या जुवा खेलने को! चंद पैसे के लिए देश का युवा बरबाद हो जाए इन्हें कोई मतलब नहीं और जो क्रिकेटर देश के युवाओं को जुवा खेलने को प्रोत्साहित कर रहे हैं। लेकिन आपको इसकी लत लग गयी ना! आपका घर तक बिक जाएगा।’’ सध्याच्या ऑनलाईन जुगारावर एका तरुणीने व्यक्त केलेली खंत पैशाच्या मागे असलेल्या क्रिकेटपटू व सिनेस्टारचा असली चेहरा चव्हाटय़ावर आणणारी आहे.

कल्याण भगत व रतन खत्रीच्या काळातील मटका आता ऑनलाईन अधिकृतरीत्या तुम्ही कोणत्याही ऍपवर खेळू शकता. ड्रीम इलेव्हन या गेमची तर आता नामांकित क्रिकेटपटू, सिनेस्टार जाहिरात करू लागले आहेत. म्हणजे आजच्या पुढच्या पिढीला देशोधडीला लावण्याचे काम राज्यकर्ते, क्रिकेटपटू व सिनेस्टार करीत आहेत. तेव्हा जनहो, सावधान! ड्रीम इलेव्हन म्हणा किंवा नवनवीन ऍपवर जो जुगार खेळला जातो त्याचे व्यसन जर तुम्हाला, तुमच्या मुलांना जडले तर तुम्हाला घरदार विकावे लागेल. या क्रिकेटपटूंना, सिनेस्टारना या देशाशी, तरुण पिढीशी काहीही देणेघेणे नाही, ते पैशांसाठी काहीही करू शकतात. व्हिडीओ व्हायरल करणारी ती तरुणी अगदी पोटतिडकीने हे सारे सांगत आहे, ऑनलाईन जुगारापासून दूर राहण्याचे आवाहन करीत आहे. 

कल्याण भगत व रतन खत्रीच्या काळात गोरगरीब लोक, गिरणी कामगार मटक्याच्या नादी लागून बरबाद होत होते. तोच कल्याण भगत व रतन खत्रीचा मटका आता नव्या रूपात नवा चेहरा घेऊन तुमच्या समोर आला आहे. त्यापासून सावधान! जुन्या 60-70च्या काळात लोक नाक्यावर जाऊन कुठेतरी कोपऱयात असलेल्या मटक्याच्या धंद्यावर जाऊन तीन आकडय़ांचा मटका लावायचे. परंतु तुम्ही आता घरात बसून (सरकार पुरस्कृत) जुगार खेळू शकता. याला बऱयाच लोकांनी विरोध केला आहे, प्रकरण कोर्टातही गेले आहे. परंतु लोकांच्या विरोधाला कोण जुमानतो आहे! सरकारने ऑनलाईन गेम अधिकृत केल्याने सरकारला टॅक्स मिळत आहे. मग कोण बरबाद झाले, देशोधडीला लागले तर सरकारला काय फरक पडतो!

जसे कल्याण भगत व रतन खत्रीच्या काळात लोक बरबाद झाले तसे आता ऑनलाईन जुगार खेळणारेही होत असून ज्या कुणी ड्रीम इंडिया-11च्या नावाने जुगार सुरू केला आहे त्या दोन गुजरातच्या व्यावसायिकांनाही आज ना उद्या पश्चात्ताप होईल. ‘‘मटका हा एक नीच धंदा आहे,’’ असे खुद्द मटका किंग रतन खत्री त्याच्यावर मिसाची कारवाई झाल्यानंतर पोलिसांना म्हणाला होता. लोकांना फसविण्याचा धंदा ज्यांनी ज्यांनी सुरू केला ते ते वाईट पद्धतीने संपले. कल्याण भगतच्या कुटुंबीयांची शोकांतिका तर अंगावर शहारे आणणारी आहे.

कल्याण भगत हा मूळचा गुजरातमधील कच्छचा! 1941 साली तो मुंबईत आला. वरळीमध्ये त्याची मसाल्याची दुकाने होती. न्यूयॉर्कमधील कापसाच्या मार्केटच्या चालूबंद भावावर कल्याण मुंबईत सुरुवातीला मटका बेटिंग चालवायचा. 1961च्या सुमारास न्यूयॉर्क कॉटन एक्सचेंजची ओपनिंगक्लोजिंग ही प्रथा बंद झाली. परंतु मुंबईत मटका बेटिंगचा धंदा काही बंद झाला नाही. पाकिस्तानात जन्मलेल्या व मुंबईत स्थलांतरित झालेल्या रतन खत्रीने कल्याण भगतबरोबर मटका बेटिंग सुरू ठेवले. कल्याण भगतबरोबर बिनसल्यानंतर रतन खत्रीने स्वतःचा मटका सुरू केला. कल्याण भगतचा दुपारी 12.30 वाजता कल्याण बाजार तर रतन खत्रीचा रात्री 9.30चा मेन बाजार मटका होता. माणेकचा वरळी रेसकोर्स येथे जनता बाजार मटका होता. मटक्याचे हे बेताज बादशहा रोज करोडो रुपये कमवायचे. त्या काळात, विशेषतः गिरणी कामगार मोठय़ा प्रमाणात तीन आकडी मटका खेळायचे.

मटका व्यवसायाला त्या वेळी राज्यकर्त्यांचा, पोलिसांचा छुपा पाठिंबा होता. रोज करोडो रुपये कमविणाऱया रतन खत्रीच्या जीवनावर धर्मात्मा हा हिंदी चित्रपट 1975 साली प्रदर्शित झाला होता. रंगीला रतन, रोड नं. 303, मै और मेरा भाई असे बरेच मल्टिस्टार चित्रपट रतन खत्रीने छोटा शकीलप्रमाणे डमी निर्माते उभे करून प्रदर्शित केले व काळा पैसा पांढरा केला. बऱयाच राजकीय पुढाऱयांची रतन खत्रीकडे इन्व्हेस्टमेंट होती. तरीही तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी आणीबाणीच्या काळात रतन खत्रीला दोन वर्षे मिसाखाली जेलमध्ये डांबले. जेलमधून बाहेर पडल्यावर रतन खत्री म्हणाला की, मटक्याचा धंदा मी बंद केला आहे. माझ्या नावावर कुणी मटका चालवत असेल तर मला माहीत नाही. रतन खत्री हा शब्दाचा तसा पक्का होता. गेल्या तीस वर्षांपासून मटका व्यवसायापासून अलिप्त असणारा रतन खत्री अलीकडेच कोरोना काळात मुंबई सेंट्रल येथील आपल्या नवजीवन सोसायटीमधील घरात वृद्धापकाळाने वयाच्या 88व्या वर्षी मरण पावला. त्याआधी 1990च्या सुमारास कल्याण भगतने या जगाचा निरोप घेतला होता. रतन खत्रीच्या मागे मटका चालविणारा कुणी नाही, परंतु ज्याने या मुंबईत मटका सुरू केला, करोडोची मालमत्ता, माया जमा केली त्या कल्याण भगतच्या कुटुंबीयांनी प्रॉपर्टीसाठी एकमेकांच्या हत्येच्या सुपाऱया दिल्या. आजही दिल्या जात आहेत. कल्याण भगतला जयंतीलाल भगत, विनोद भगत व सुरेश भगत असे तीन मुलगे! त्यातील सुरेश भगतला त्याची पत्नी जया, तिचा प्रियकर सुहास रोगे, मुलगा हितेश यांनी बोरिवलीच्या हरीश रामा मांडवीकर यास 85 लाखांची ठार मारायची सुपारी दिली. सुरेश भगत अलिबागच्या न्यायालयातून बाहेर पडल्यावर त्याच्या जीपला 2008 साली अपघात घडवून त्याला मारलेही, परंतु त्या मोठय़ा अपघातात सुरेश भगतसह सात जण नाहक ठार झाले. सुरेश भगत फॅमिलीमध्ये प्रॉपर्टी व मटका ताब्यात घेण्यासाठी वॉर सुरू आहे. 

मध्यंतरी क्रिकेट बेटिंग घेणाऱया व मॅच फिक्सिंगमध्ये अडकलेल्या बुकी व क्रिकेटपटूंना जुगार प्रतिबंधक व मोका कायद्यान्वये दिल्ली पोलिसांकडून अटक झाली होती. याचे भान राज्यकर्त्यांना नसल्यामुळेच सरकारने ऑनलाईन गेमिंगला मान्यता दिली आहे, परंतु ऑनलाईन गेमिंगमध्ये, रमीमध्ये हरणारे बरेच लोक रस्त्यावर येत आहेत, आत्महत्या करीत आहेत. हे सदर लिहीत असतानाच रायगड जिह्यातील (वर्षाला 50 लाख रुपये पगार घेणाऱया) विश्वनाथ गावंड या  इंजिनीअरने ऑनलाईन रमी गेममध्ये चार कोटी रुपये गमावल्याने विष पिऊन आत्महत्या केली. आता बोला! राज्यकर्त्यांच्या संवेदनाच मेल्या आहेत.