मॅनेजमेंटच्या विद्यार्थ्यांची अनंत चतुर्दशीला परीक्षा; युवासेनेची परीक्षा पुढे ढकलण्याची मागणी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

अनंत चतुर्दशीला शासकीय सुट्टी असताना आयसीएफएआय बिझनेस स्कूल (आयबीएस) या हैदराबादमधील शैक्षणिक संस्थेच्या मुंबई शाखेने पोस्ट ग्रॅज्युएशन मॅनेजमेंट प्रोग्रामच्या (पीजीपीएम) विद्यार्थ्यांची परीक्षा 28 सप्टेंबरला अनंत चतुर्दशीच्याच दिवशी ठेवली आहे. ही परीक्षा पुढे ढकलण्यात यावी किंवा आधी घेण्यात यावी, अशी मागणी विद्यार्थ्यांच्या वतीने शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) युवासेनेने आयबीएस इन्स्टिटय़ूटकडे केली आहे.

पीजीपीएम अभ्यासक्रमाची प्रथम सत्राची परीक्षा 25 सप्टेंबर ते 1 ऑक्टोबर यादरम्यान होणार आहे. 28 सप्टेंबरला अनंत चतुर्दशी दिवशी गणेश विसर्जन असताना अकाऊंटिंग फॉर मॅनेजर्स या विषयाची परीक्षा होणार आहे. वास्तविक या दिवशी राज्य सरकारने सुट्टी जाहीर केली असताना परीक्षा घेण्यात येणार असल्याने विद्यार्थ्यांनी नाराजी व्यक्त केली आहे. त्यामुळे मुंबई विद्यापीठ, युवासेना माजी व्यवस्थापन परिषद सदस्य प्रदीप सावंत आणि राजन कोळंबेकर यांनी संस्थेच्या दादर येथील कार्यालयात जाऊन सदर परीक्षा अगोदर किंवा नंतर घेण्यात यावी यासाठी निवेदन दिले. दादर कार्यालयातील कर्मचाऱयांनी पवई येथील मुख्य कार्यालयात संपर्क करून याबाबत माहिती दिली असता परीक्षेबाबत सभेत निर्णय घेतला जाईल, असे सांगण्यात आले. चार दिवसांनंतर या परीक्षेविषयी आयबीएसने निर्णय जाहीर केला. ज्या विद्यार्थ्यांना 28 सप्टेंबर रोजी परीक्षा देता येणार नाही त्यांची परीक्षा 12 ऑक्टोबर रोजी घेण्यात येईल, असे संस्थेच्या वतीने जाहीर करण्यात आले. गणेश विसर्जनामुळे या दिवशी परीक्षा घेऊ नये अशी मागणी युवासेनेच्या वतीने संस्थेकडे करण्यात आली. तसेच आयबीएसने परीक्षा घेण्याचा अट्टाहास कायम ठेवल्यास याप्रकरणी पुढे रीतसर तक्रार नोंदवली जाईल, असा इशाराही युवासेनेच्या वतीने देण्यात आला. याप्रसंगी युवासेना पदाधिकारी नीलेश बडदे आणि रितेश सावंत उपस्थित होते.