
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रवक्ते व राज्याचे अल्पसंख्याकमंत्री नवाब मलिक यांनी मुंबई बॉम्बस्फोट मालिकेतील दोघा आरोपींकडून कुर्ला येथील मोक्याच्या जागेवरील साडेतीन कोटी रुपयांची जमीन अवघ्या वीस लाख रुपयांमध्ये घेतल्याचा खळबळजनक आरोप विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी आज केला. यासंदर्भातील कागदपत्रे आपण राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार व संबंधित तपास यंत्रणांना पाठवणार असल्याचे ते म्हणाले.
कार्डेलिया क्रूझवरील छापेमारीनंतर ड्रग्जच्या मुद्दय़ावरून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी मागील एक महिन्यापासून दररोज नवनवीन आरोपांची मालिका सुरू ठेवली होती. त्यावर आपण दिवाळीनंतर फटाके फोडू, अशी घोषणा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केली होती. त्यानुसार देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकार परिषद घेतली आणि नवाब मलिक यांनी बॉम्बस्फोटातील आरोपींकडून कुर्ला एलबीएस मार्गावरील गोवावाला कम्पाऊंडमधील जागा विकत घेतल्याचा आरोप केला.
मुंबई बाँम्बस्फोट प्रकरणात जन्मठेपेची शिक्षा भोगत असलेला सरदार शहावली खान व कुख्यात दाऊद इब्राहिमची बहीण हसिना पारकर हिचा बॉडिगार्ड मोहम्मद अली इशाक पटेल या दोनजणांकडून नवाब मलिक यांनी ही जमीन खरेदी केल्याचा आरोप देवेंद्र फडणवीस यांनी केला.
कुर्ला येथील एलबीएस मार्गावरील गोवावाला कम्पाऊंडमधील ही सुमारे तीन एकर जागा आहे. या जमिनीचा व्यवहार सॉलिडस या पंपनीसोबत झाला. मरियमबाई गोवावाला व मुदिरा प्लंबर या दोघांकडून जमीन घेतली. त्यात समील पटेल हे पॉवर ऑफ अॅटर्नी होल्डर आहेत. त्यात विक्री करणारा शहावली खान आहे. या दोघांनी मिळून ही जमीन मलिक यांच्या कुटुंबीयांच्या सॉलिडस इन्व्हेस्टमेंट पंपनीला विकली. त्यावर नवाब मलिक यांचा मुलगा फराज मलिक यांची खरेदी करणारा म्हणून सही आहे. 2019मध्ये नवाब मलिक सॉलिडस पंपनीत होते पण आज त्यांचे कुटुंबच या पंपनीत आहेत, असा दावा देवेंद्र फडणवीस यांनी केला.
सरदार शहावली खान कोण आहे
शहावली खान हा मुंबईत 12 मार्च 1993 रोजी झालेल्या साखळी बॉम्बस्फोट प्रकरणात तुरुंगात जन्मठेपेची शिक्षा भोगत आहे. शस्त्रs चालवण्याचे प्रशिक्षण त्याने घेतले होते. बॉम्बस्फोटापूर्वी कुख्यात टायगर मेमनच्या घरी झालेल्या कटाच्या बैठकीत त्याचा सहभाग होता. स्फोटकांसाठी वापरण्यात आलेल्या मोटारींमध्ये त्याने आरडीएक्स भरले होते. मुंबई महापालिका व मुंबई शेअर बाजारात स्फोटके ठेवण्यासाठी त्याने रेकी केली होती, अशी माहिती देवेंद्र फडणवीस यांनी दिली.
इशाक पटेल कोण आहे
मोहम्मद अली इशाक पटेल ऊर्फ सलीम पटेल हा हसिना पारकर हिचा बॉडिगार्ड तसेच ड्रायव्हर व दाऊद गँगचा म्होरक्या होता. हसिना पारकरसोबत त्यालाही अटक झाली होती. सलीम पटेलच्या नावाने पॉवर ऑफ अॅटर्नी करून पैसा गोळा केला जायचा. सलीम पटेल जमीन लाटण्याच्या धंद्यातला प्रमुख आहे, असे देवेंद्र फडणवीस म्हणाले.
आर. आर. पाटील यांचा दोष नव्हता
तत्कालीन गृहमंत्री आर. आर. पाटील यांनी एकदा इफ्तार पार्टीला हजेरी लावली होती तेव्हा सलीम पटेलसोबत त्यांचा पह्टो व्हायरल झाला होता. पण त्यामध्ये आर. आर. पाटील यांचा कोणताही दोष नव्हता, असे स्पष्टीकरणही देवेंद्र फडणवीस यांनी दिले.
शरद पवार यांना कागदपत्रे देणार
हे प्रकरण राष्ट्रीय सुरक्षिततेशी संबंधित आहे. त्यामुळे याची कागदपत्रे संबंधित यंत्रणेकडे पाठवणार आहे. तसेच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्याकडेही या संबधित कागदपत्रे सोपवणार असल्याचे देवेंद्र फडणवीस म्हणाले.
साडेतीन कोटींच्या जमिनीचा वीस लाखांत व्यवहार
कुर्ला येथील फिनिक्स मार्पेटच्या मागील एलबीएस रोडवरील या जमिनीचा रेडिरेकनरप्रमाणे दर 8 हजार 500 रुपये होता. पण 2 हजार 53 रुपये प्रतिचौरस फूट या दराने या जमिनीचा व्यवहार झाला आणि जागा तीस लाख रुपयांमध्ये खरेदी केली. त्याचे पैसे मालकाला मिळाले नाहीत तर सलीम पटेलच्या खात्यात 15 लाख रुपये जमा झाले. त्यानंतर 10 लाख रुपये शहावली खानला मिळाले. त्यात पाच लाख रुपये नंतर मिळतील असे नमूद केले.




























































