
बोरिवली येथील एका खासगी कंपनीची सायबर ठगाने फसवणूक केली आहे. बनावट बँक खात्याचा नंबर देऊन कंपनीची सात लाख रुपयांची फसवणूक झाली आहे. फसवणुकीप्रकरणी एमएचबी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल आहे.
कांदिवली येथे व्यावसायिक राहत असून त्याची दहिसर येथे कंपनी आहे. कंपनी ही हाँगकाँग येथून मायक्रोस्कोप मागवून त्याची हिंदुस्थानात विक्री करतात. गेल्या दोन वर्षांपासून व्यावसायिक हे हाँगकाँग येथून माल मागवतात. मालाचे पैसे बँक ऑनलाइन पाठवले जातात. ऑगस्ट महिन्यात व्यावसायिकांच्या कंपनीला एक मेल आला. कंपनीचे बँक खाते बदलले असून दुसऱया बँकेत खाते सुरू करण्यात आले आहे.
मालाचे पैसे ई-मेलमध्ये नमूद केलेल्या बँक खात्यात जमा करण्यास सांगितले. त्यावर विश्वास ठेवून कंपनीने दुसऱया बँक खात्यात पैसे जमा केले. त्यानंतर कंपनीने ई-मेल पाठवून पैसे मिळाले का, अशी विचारणा केली तेव्हा त्या कंपनीने पैसे आले नसल्याचे सांगितले. तेव्हा व्यावसायिकाच्या कंपनीने पैसे पाठवल्याचा तपशील त्या कंपनीला पाठवला. फसवणूक झाल्याचे लक्षात येताच कंपनीने एमएचबी पोलीस ठाण्यात धाव घेतली. घडल्या प्रकाराची माहिती पोलिसांना दिली. व्यावसायिकाच्या तक्रारीवरून पोलिसांनी अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा नोंद केला आहे.


























































