सामना प्रतिनिधी, मुंबई
सीएसएमटी रेल्वे पोलिसांनी शनिवारी तोतया टीसीला अटक केली. गणेश सुरेश आसगावकर ऊर्फ जी. एस. असे त्याचे नाव आहे. त्याला पुढील तपासकरिता मिरज रेल्वे पोलिसांच्या ताब्यात दिले जाणार आहे. गणेश हा मूळचा कोल्हापूरचा रहिवासी आहे. शुक्रवारी तो महालक्ष्मी एक्स्प्रेसने कोल्हापूर ते मुंबई असा प्रवास करत होता. प्रवासादरम्यान रात्री एक्स्प्रेस सांगली स्थानकात थांबली. जनरल डब्यातून प्रवास करताना गणेश प्रवाशांची तिकिटे तपासत होता. तेव्हा एका प्रवाशाला संशय आला. त्याने याची माहिती हेड टीसी प्रकाश रासकर यांना दिली.
शनिवारी महालक्ष्मी एक्स्प्रेस सीएसएमटी स्थानकात आली तेव्हा गणेशला ताब्यात घेण्यात आले. त्याला पुढील चौकशीकरिता सीएसएमटी रेल्वे पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले. गणेशकडून एक ओळखपत्र जप्त केले असून ओळखपत्रामध्ये टीसीबाबत असलेल्या चुकीच्या उल्लेखामुळे गणेश पकडला गेला. तपासादरम्यान पोलिसांनी गणेशकडून एक मोबाईल, सीआरएमएस असे लिहिलेले कार्ड जप्त केले आहे. त्याला टीसीचे कार्ड कोणी बनवून दिले, त्याचे कोणी साथीदार आहेत का याचा तपास मिरज रेल्वे पोलीस करणार आहेत.





























































