न्याय व्यवस्थेतील भीष्माचार्य हरपला, ज्येष्ठ विधिज्ञ फली नरिमन यांचे निधन

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

आपल्या परखड आणि सडेतोड भाष्यासाठी प्रसिद्ध असलेले ज्येष्ठ कायदेतज्ञ फली एस. नरिमन यांचे बुधवारी पहाटे निधन झाले. 1991 मध्ये ‘पद्मभूषण’ आणि 2007 मध्ये ‘पद्मविभूषण’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेले नरिमन 95 वर्षांचे होते.

दिल्लीच्या खान मार्पेटजवळील पारसी आरामगाह येथे उद्या सकाळी 10 वाजता त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. यानंतर बहादूरशाह जफर मार्गावरील पारसी अंजुमन (धर्मशाळा) येथे दुपारी 4 वाजता त्यांच्यासाठी प्रार्थना सभा होईल. त्यांच्या पश्चात मुलगा आणि सर्वोच्च न्यायालयाचे माजी न्यायाधीश रोहिंटन एफ. नरिमन, मुलगी अनाहिता एफ. नरिमन आणि सून सानया या आहेत.

सात दशकांची आदर्श कारकीर्द

मुंबईच्या शासकीय विधी महाविद्यालयातून 1950 मध्ये सुवर्ण पदकासह कायद्याची पदवी घेणाऱया नरिमन यांना मुंबई उच्च न्यायालयात 1961 मध्ये वरिष्ठ वकील म्हणून नियुक्त करण्यात आले होते. दहा वर्षांनंतर ते भारताच्या सर्वोच्च न्यायालयात प्रॅक्टिस करण्यासाठी दिल्लीला गेले. न्याय आणि कायदा क्षेत्रातील त्यांच्या सात दशकांहून अधिक काळ चाललेल्या कारकीर्दीने एक आदर्श मापदंड आखून दिला होता. 1971 मध्ये इंदिरा गांधी सरकारने नरिमन यांची अतिरिक्त सॉलिसिटर जनरल म्हणून नियुक्ती केली. 1975 मध्ये आणीबाणी लागू केल्याच्या निषेधार्थ त्यांनी या पदाचा राजीनामा दिला होता.

सदसद्विवेकबुद्धीशी प्रामाणिक

आपल्या सदसद्विवेकबुद्धीशी सदैव प्रामाणिक असलेल्या नरिमन यांनी गुजरातमध्ये ख्रिश्चनांवर झालेल्या हल्ल्यांनंतर नर्मदा प्रकल्प प्रकरणी सुरू असलेल्या कोर्टकचेऱयांत गुजरात सरकारचे प्रतिनिधित्व करण्याचे नाकारून राजीनामा दिला होता. विधिज्ञ म्हणून कार्यरत असताना वैयक्तिक मूल्ये आणि नैतिकता जपण्यासही महत्त्व द्यायला हवे, असे त्यांचे म्हणणे होते. न्यायव्यवस्थेतील त्रुटी आणि सार्वजनिक क्षेत्रातील अन्याय्य बाबींवर त्यांनी नेहमीच उघडपणे टीका केली होती. ते 1999-2005 या कालावधीत राज्यसभेचे नामनिर्देशित सदस्य होते.

लढवलेले महत्त्वाचे खटले

नरिमन यांनी भारतीय घटनात्मक कायदा विकसित करण्यात मोलाचे योगदान दिले. घटनादत्त मूलभूत अधिकारांवर संसद गदा आणू शकत नाही, हे अधिकार कमी करू शकत नाही, असा निकाल देणाऱया सर्वोच्च न्यायालयातील आयसी गोलकनाथ प्रकरणात त्यांनी युक्तिवाद केला होता. टीएमए पै प्रकरणात नरिमन यांनी भारतीय राज्यघटनेच्या कलम 30 अंतर्गत अल्पसंख्याक अधिकारांच्या व्याप्तीवर युक्तिवाद केला होता. भोपाळ गॅस दुर्घटनेप्रकरणी नरिमन यांनी युनियन कार्बाइडची बाजू मांडली. मात्र पीडितांची भयानक अवस्था पाहिल्यानंतर ‘आयुष्यात केलेली ही सर्वात मोठी चूक’ अशी प्रांजळ कबुली त्यांनी दिलीच, पण या खटल्यात न्यायालयाबाहेर तडजोड घडवून आणताना पीडितांना 47 कोटी डॉलर्सची भरपाई मिळवून देण्यातही त्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली.

– राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू – उत्कृष्ट कायदेतज्ञ असलेले फली नरिमन यांनी राज्यसभेचे सदस्य म्हणून तितक्याच समर्पितपणे देशाची सेवा केली.
– पंतप्रधान नरेंद्र मोदी – फली नरिमन यांनी सर्वसामान्य नागरिकांना न्याय मिळवून देण्यासाठी आपले जीवन समर्पित केले होते.
– सरन्यायाधीश चंद्रचूड – ते एक महान प्रज्ञावंत होते. माझ्या सहवेदना त्यांच्या कुटुबीयांसमवेत आहेत.
– सॉलिसिटर जनरल तुषार मेहता – देशाने एक बुद्धिमान आणि महान व्यक्तिमत्त्व गमावले आहे. त्यांच्या अफाट योगदानामुळे न्यायशास्त्र समृद्ध झाले आहे. मी त्यांच्याविरुद्ध उभा राहून नेहमीच खूप काही शिकलो.
– अॅड. प्रशांत भूषण – नरिमन यांच्या निधनामुळे कायदेशीर इतिहासाच्या एका कालखंडाचा अंत झाला आहे. ते आमच्या विधी समुदायाचे ‘भीष्मपितामह’च होते.
– ज्येष्ठ वकील कपिल सिब्बल, अभिषेक सिंघवी, इंदिरा जयसिंग, प्रशांत भूषण आणि मेनका गुरुस्वामी यांच्यासह अनेक ज्येष्ठ वकिलांनी नरिमन यांना श्रद्धांजली वाहिली.