शेतकऱ्यांनी बंगळुरू महामार्ग रोखला! वाहतूक पर्यायी मार्गाने वळवली, लेखी निर्णयापर्यंत आंदोलन सुरूच राहणार

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

साखरेचा किमान हमीभाव आणि इथेनॉल दराबाबत सोमवारी (दि. 12) केंद्र सरकार आणि केंद्रीय कृषिमंत्र्यासोबत नवी दिल्लीत झालेली बैठक निष्फळ ठरल्याने, आज सकाळपासून हजारो शेतकऱ्यांनी पुणे-बंगळुरू महामार्गावर बेमुदत धरणे आंदोलन सुरू केले आहे. कर्नाटक व महाराष्ट्राच्या सीमेवरील कोगनोळी टोल नाका आणि कर्नाटक येथील हत्तरकी टोल नाका येथे हजारो शेतकऱयांनी ठिय्या मांडल्याने महामार्ग पूर्णपणे बंद झाला आहे. या आंदोलनामुळे महाराष्ट्र आणि कर्नाटक दोन्ही राज्यांचे पोलीस प्रशासन धास्तावले असून, परिसराला पोलीस छावणीचे स्वरूप आले आहे.

दरम्यान, जोपर्यंत केंद्र सरकार मागण्यांचा लेखी निर्णय जाहीर करत नाही, तोपर्यंत महामार्ग एक इंचही मोकळा केला जाणार नाही, असा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते, माजी खासदार राजू शेट्टी यांनी दिला आहे.

नवी दिल्ली येथे केंद्रीय कृषिमंत्री तसेच केंद्र सरकारचे प्रतिनिधी आणि शेतकरी नेत्यांमध्ये साखर आणि इथेनॉलच्या दराबाबत सोमवारी (दि. 12) बैठक पार पडली. साखरेचा किमान हमीभाव एमएसपी प्रतिकिलो 50 रुपये करावा, सी-हेव्ही इथेनॉलचा दर प्रतिलिटर 70 रुपये करावा, केंद्र सरकारच्या निर्देशानुसार साखर हंगाम लवकर सुरू केल्यामुळे शेतकऱयांना प्रतिटन 500 रुपये अनुदान द्यावे, या प्रमुख मागण्यांवर चर्चा झाली. मात्र, केंद्र सरकारकडून या मागण्यांवर कोणताही सकारात्मक निर्णय न झाल्याने बैठक निष्फळ ठरली. याच्या निषेधार्थ राजू शेट्टी यांनी आज थेट दोन्ही राज्यांच्या सीमांवर महामार्ग रोको आंदोलनातून ‘आरपार’च्या लढाईची घोषणा केली होती.

आजच्या आंदोलनासाठी सकाळपासूनच शेतकरी एकत्र येऊ लागल्याने दोन्ही राज्यांच्या पोलिसांनी कोगनोळी टोल नाक्याकडे धाव घेतली. महामार्गावर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्याने पोलिसांनी तत्काळ वाहतूक रोखून ती अंतर्गत ग्रामीण व पर्यायी मार्गांनी वळवण्यास सुरुवात केली. सुरक्षेचा उपाय म्हणून पुणे-बंगळुरू महामार्ग सध्या बंद ठेवण्यात आला असून, प्रवाशांना पर्यायी मार्गांचा वापर करण्याचे आवाहन प्रशासनाने केले आहे.

रात्री उशिरापर्यंत तोडगा नाही

– केंद्र सरकारकडून आंदोलनाबाबत रात्री उशिरापर्यंत कसलाही सकारात्मक तोडगा निघाला नव्हता. त्यामुळे हे आंदोलन आणखी किती काळ चालणार याकडे शेतकऱयांसह या मार्गावरून प्रवास करणाऱ्या हजारो नागरिकांचे लक्ष लागले आहे.

कागल, निपाणी भागातून आंदोलकांसाठी भाकरी संकलन

– शेतकऱ्यांनी आंदोलनाच्या ठिकाणीच मुक्काम ठोकण्याची तयारी केली आहे. कागल आणि निपाणी तालुक्यातील गावांमधून शेतकऱयांसाठी भाकरी आणि पिठलं गोळा केले जात असून, टोल नाक्यावरच सामूहिक जेवणाची व्यवस्था करण्यात येत आहे. पोलिसांच्या बंदोबस्तामुळे आंदोलनाला छावणीचे स्वरूप आले आहे. केंद्र सरकारने यावर तातडीने तोडगा न काढल्यास हे आंदोलन अधिक उग्ररूप धारण करेल आणि याचे थेट राजकीय व आर्थिक फटके केंद्र आणि राज्य सरकार या दोघांनाही सहन करावे लागतील, असा इशारा राजू शेट्टी यांनी दिला आहे.