
बॉलिवूडमध्ये एकामागोमाग एका कलाकाराला कोरोनाची लागण होत आहे. ‘दंगल’ गर्ल फातिमा सना शेखही कोरोनाच्या कचाट्यात सापडली असून तिने एक पोस्ट शेअर करून आपले दु:ख व्यक्त केले आहे.
फातिमा सना शेख हिची कोरोना चाचणी काही दिवसांपूर्वी पॉझिटिव्ह आली होती. कोरोनाची लागण झाल्यानंतर ती घरीच विलगीकरणात राहून उपचार घेत आहे. कोरोना संक्रमण काळातील सर्व नियमही ती पाळत आहे. या दरम्यान तिने आपल्या तब्येतीची माहिती देणारी एक पोस्ट सोशल मीडियावर केली आहे.
कोरोनाचा सामना करताना कोणत्या वेदनांचा सामना करावा लागतोय हे फातिमा हिने आपल्या पोस्टमध्ये नमूद केले आहे. कोरोनामुळे वास घेण्याची आणि चव ओळखण्याची क्षमता कमी झाल्याचे तिने आपल्या पोस्टमध्ये म्हटले आहे. तसेच अंगदुखीही होत असल्याचे तिने म्हटले आहे.
या पोस्टसोबत फातिमा हिने एक फोटोही शेअर केला आहे. या फोटोत ती बेडवर झोपलेली दिसत असून तिच्या चेहरा आजारपणामुळे उदासवाणा दिसत आहे. कोरोना बकवास आहे, असेही तिने या फोटोसोबत शेअर केलेल्या पोस्टमध्ये म्हटले आहे.

29 मार्चला झाली होती लागण
याआधी 29 मार्चला तिने एक पोस्ट शेअर करत आपल्याला कोरोनाची लागण झाली आहे, अशी माहिती दिली होती. कोरोनाची लागण होण्यापूर्वी ती अनिल कपूरसोबत एका चित्रपटाचे चित्रिकरण करत होती. मात्र या दरम्यान तिला कोरोनाची लागण झाली. याची माहिती मिळताच अनिल कपूर याने तिच्या तब्येतीची चौकशी करत तिच्यासाठी खास जेवणही पाठवले होते. याचा फोटोही तिने शेअर केला होता.




























































