जालन्यात भरदिवसा गोळीबार; एकाचा मृत्यू, एकाला अटक

विविध गुन्ह्यांमध्ये आरोपी असलेल्या गजानन तौर या तरुणाची सोमवारी दुपारी 2 वाजण्याच्या सुमारास जालना शहरात भर चौकात भर दिवसा गोळ्या घालून हत्या करण्यात आली आहे. जालना शहरातील मंठा चौफुली येथे सोमवारी दुपारी ही घटना घडली आहे. एका कार्यक्रमाचे नियोजन करण्यासाठी जालना शहरातील मंठा चौफुली परिसरात दुपारी 2 वाजेच्या सुमारास तौर आपल्या काही सहकार्‍यांसह उभे होते. या वेळी मोटरसायकलने आलेल्या अज्ञात हल्लेखोरांनी त्यांच्यावर गोळ्या झाडल्या. सुमारे पाच गोळ्या झाडल्याची प्राथमिक माहिती आहे. यापैकी तीन गोळ्या त्यांना लागल्या. एक गोळी डोक्यात आणि दोन गोळ्या पाठीत लागल्याची माहिती मिळाली आहे.

हल्लेखोरांपैकी दोन हल्लेखोर हे जालन्यातील आणि एक हल्लेखोर हा बाहेरच्या जिल्ह्यातील असल्याची माहिती मिळाली आहे. गोळीबार झाल्यानंतर हल्लेखोर फरार झाले आहेत. घटनेची माहिती मिळतात पोलीस अधीक्षक शैलेश बलकवडे यांनी आपल्या कर्मचार्‍यांसह घटनास्थळ गाठले आणि आरोपींचा शोध सुरू केला आहे. गजानन तौर यांना जखमी अवस्थेतच त्यांच्या सहकार्‍यांनी शहरातील कलावती रुग्णालयात दाखल करण्यासाठी नेले होते. परंतु तिथे दाखल न केल्याने त्यांनी शहरातील दीपक रुग्णालय गाठले. तेथे डॉक्टरांनी प्राथमिक माहिती घेत त्यांना सामान्य रुग्णालयात नेण्याचा सल्ला दिला. त्यांच्या सहकार्‍यांनी सामान्य रुग्णालयात आणल्यानंतर डॉक्टरांनी त्यांना तपासून मृत घोषित केले.

या घटनेची माहिती जिल्ह्यामध्ये पसरली आणि गजानन तौर यांचे मित्र मंडळ सामान्य रुग्णालयामध्ये गर्दी करू लागले. त्यांचा मृतदेह शवविच्छेदनासाठी संभाजीनगर येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात पाठविण्यात आला आहे. घटनास्थळावरून पोलिसांनी रक्ताने माखलेला एक चाकू आणि काही काडतुसे जप्त केली आहेत. गजानन तौर यांच्यावर यापूर्वी अनेक गुन्हे दाखल आहेत. त्यापैकीच एक संघटित गुन्हेगारीचा दाखल होता आणि त्या प्रकरणात त्यांना स्थानबद्धही केले होते. त्यामुळे या प्रकरणातील काही दिवस त्यांनी शिक्षाही भोगावी लागली आहे.