फिरोदिया, पोखर्णासह पाचजणांनी अटकपूर्व जामीन अर्ज घेतला मागे

निंबळक येथील आदिवासी महिलेची फसवणूक करून जमीन बळकावल्या प्रकरणात जिल्हा न्यायालयाच्या आदेशाने ऍट्रॉसिटी व फसवणुकीचा गुन्हा दाखल झालेले उद्योजक नरेंद्र फिरोदिया, आशिष पोखर्णासह पाच आरोपींनी न्यायालयात दाखल केलेले अटकपूर्व जामीन अर्ज माघारी घेतले आहेत. जिल्हा न्यायाधीश (वर्ग-2) यांच्या न्यायालयात हे अर्ज दाखल करण्यात आले होते. त्यामुळे या गुह्यातील आरोपींच्या अडचणी वाढल्या आहेत.

आदिवासी महिलेच्या फिर्यादीवरून न्यायालयाच्या आदेशाने उद्योजक नरेंद्र शांतिलाल फिरोदिया, गौतम विजय बोरा, आशिष रमेश पोखर्णा, आकाश राजकुमार गुरुनानी व अजय रमेश पोखर्णा यांच्यासह 13 जणांविरुद्ध एमआयडीसी पोलीस ठाण्यात 11 एप्रिलला गुन्हा दाखल करण्यात आला होता. या गुह्यातील पाच आरोपींनी न्यायालयात 22 एप्रिलला अटकपूर्व जामीन मिळावा म्हणून अर्ज दाखल केले होते. परंतु, या आरोपींना अटकपूर्व जामीन देण्यात येऊ नये, असे म्हणणे पोलिसांच्या वतीने 29 रोजी न्यायालयात सादर करण्यात आले होते. तसेच सरकार पक्षाला मदतनीस म्हणून काम पाहण्यासाठी ऍड. अभिजीत पुप्पाल यांनी विनंती अर्ज दाखल केला होता. हा अर्ज न्यायालयाने मंजूर केला. त्यामुळे आता सरकार पक्षाच्या वकिलांना ऍड. पुप्पाल हे मदतनीस म्हणून कामकाज पाहणार आहेत.

दरम्यान, पोलिसांचे म्हणणे व एकूण परिस्थिती पाहिल्यावर अटकपूर्व जामीन अर्ज मंजूर होणार नाही, हे लक्षात आल्याने पाच आरोपींनी दाखल केलेले अटकपूर्व जामीन अर्ज माघारी (विड्रॉल) घेतले आहेत. त्यामुळे पोलीस आता आरोपींना अटक करतात का, याकडे लक्ष लागले आहे.