
राष्ट्रीय जनता दलाचे प्रमुख लालूप्रसाद यादव यांची प्रकृती चिंताजनक बनली आहे. गुरुवारी सकाळपासून त्यांच्या शरीराची हालचाल बंद झाली आहे, मात्र प्रकृती स्थिर आहे, असे दिल्लीच्या एम्स रुग्णालयातील डॉक्टरांनी सांगितले. लालूंच्या पत्नी राबडी देवी यांनी लालूंच्या तब्येतीत सुधारणा होण्यासाठी प्रार्थना करण्याचे आवाहन समर्थकांना केले आहे.
पाटणा येथील निवासस्थानी शिडीवरून खाली पडल्याने लालूंचा खांदा आणि पायासह तीन ठिकाणी फ्रॅक्चर झाले आहे. सुरुवातीला त्यांच्यावर स्थानिक रुग्णालयात उपचार केले गेले. मात्र प्रकृती गंभीर बनल्याने बुधवारी रात्री पाटणा येथून एअर अॅम्ब्युलन्समधून दिल्लीला हलवून एम्स रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. औषधांचा ओव्हरडोस घेतल्यामुळे त्यांची प्रकृती अत्यवस्थ झाली आहे. तज्ञ डॉक्टरांचे पथक लालूंच्या प्रकृतीची विशेष काळजी घेत आहे.
लालूंची प्रकृती बरी व्हावी यासाठी त्यांचे समर्थक, राजदचे नेते व कार्यकर्ते बिहारमध्ये गोपालगंजपासून पाटण्यापर्यंत ठिकठिकाणच्या अनेक मंदिरांमध्ये पूजाअर्चा आणि होमहवन करत आहेत.




























































