
महाराष्ट्रातून पाकिस्तानची हेरगिरी करणाऱया तरुणाला महाराष्ट्र एटीएसने पकडले. पाकिस्तानच्या दोघा इंटेलिजन्स ऑपरेटिव्हशी समाजमाध्यमावर संपका&त राहून त्यांना हिंदुस्थानातील प्रतिबंधित क्षेत्राची गोपनीय व संवेदनशील माहिती पुरवीत होता. यासाठी त्याला पाकिस्तानी गुप्तहेरांकडून पैसे मिळत होते. गौरव पाटील असे त्या तरुणाचे नाव असल्याचे समजते. एटीएसने नवी मुंबईतून त्याला उचलल्यानंतर अन्य तिघांनाही अटक केली.
मुंबईतील नौदलाच्या गोदीत सिव्हिल अॅपरेडिन्सशीप करणारा एक तरुण पीआयओ (पाकिस्तानी गुप्तहेर) साठी हेरगिरी करतोय. तो हिंदुस्थानातील संवेदनशील ठिकाणाची गोपनीय माहिती पाकिस्तानला पुरवीत असल्याची माहिती एटीएसला मिळाली. त्यानुसार एटीएसने त्या तरुणाला ताब्यात घेऊन त्याची कसून चौकशी केली. एप्रिल-मे ते ऑक्टोबर या कालावधीत सदर तरुणाची फेसबुक व व्हॉट्सअॅपवर दोन पीआयओशी ओळख झाली. त्या गुप्तहेरांशी त्या तरुणाने समाजमाध्यमांवर चॅटिंग करून हिंदुस्थान सरकारने प्रतिबंधित केलेल्या क्षेत्रातील गोपनीय माहिती वेळोवेळी पुरविली. तसेच त्याने या हेरगिरीच्या मोबदल्यात त्या पाकिस्तानी गुप्तहेरांकडून ऑनलाइन पैसे स्वीकारल्याचे तरुणाच्या चौकशीत निष्पन्न झाले. त्यामुळे एटीएसने त्या तरुणासह त्याच्या संपका&त असलेल्या अन्य तिघा तरुणांना अटक केली आहे. या प्रकरणात आणखी अटकेची कारवाई होण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. 20 ते 25 वयोगटातील तो तरुण असून गौरव पाटील असे त्याचे नाव असल्याचे समजते. एटीएसने नवी मुंबईतून त्याला उचलले. त्याची अधिक चौकशी एटीएसकडून सुरू आहे.





























































