परवानगी नसताना बैलगाडा शर्यत भरविली, राहुरी पोलिसांत चौघांवर गुन्हा

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

जिल्हाधिकाऱयांची परवानगी नसताना राहुरी तालुक्यातील चिंचाळे फाटा येथे बिरोबा देवस्थान यात्रेनिमित्त बैलगाडा शर्यत भरविणाऱया चौघांविरुद्ध राहुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सोन्याबापू चिमाजी कोळसे, बापूसाहेब राणोजी गडदे, योगेश सोपान गडदे, संदीप भागवत बाचकर (सर्व रा. गडदे आखाडा, ता. राहुरी) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. याबाबत हेड कॉन्स्टेबल जानकीराम खेमनर यांनी फिर्याद दिली आहे.

ताहाराबाद रोडलगत चिंचाळे फाटा येथे सोमवारी बिरोबा देवस्थानची यात्रा होती. या यात्रेनिमित्त जिल्हाधिकाऱयांची परवानगी नसताना बैलगाडा शर्यत भरविल्याची माहिती पोलीस निरीक्षक मेघश्याम डांगे यांना मिळाली. त्यानुसार पोलीस यात्रास्थळी दाखल झाले असता, 40 ते 50 बैलगाडय़ा दिसून आल्या. बैलांनी अधिक वेगाने पळावे याकरिता बैलगाडाधारकांनी चाबकाचे कोडे बैलांच्या पाठीवर व पायावर मारून, तसेच त्यांची शेपटी पिरगाळल्याचे दिसून आले.

त्यामुळे पोलिसांनी शर्यतीचे आयोजन करणाऱया चारजणांवर गुन्हा दाखल केला आहे. पोलीस नाईक रामनाथ सानप तपास करीत आहेत.