
स्वस्त सोने देतो असे सांगून व्यापाऱ्याची फसवणूक केल्याप्रकरणी महिलेला सहार पोलिसांनी अटक केली. पल्लवी शांताराम पोर्जे ऊर्फ पल्लवी भदाणे असे तिचे नाव आहे. या गुन्ह्यात आणखी एक जण फरार असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत.
तक्रारदार हे कांदा व्यापारी असून महिन्याभरापूर्वी तक्रारदार याची फेसबुकवरून फरार आरोपीशी ओळख झाली होती. फरार आरोपीने आपण कस्टम विभागाकडून जप्त केलेले सोने लिलावात विक्री करण्याचे काम करतो अशा भूलथापा मारल्या. स्वस्तात सोने देऊ असे आरोपीने तक्रारदार यांना सांगितले. विश्वास बसावा म्हणून फरार आरोपी आणि पल्लवीने तक्रारदार यांना 5 लाख रुपये घेऊन 125 ग्रॅम सोने दिले होते. त्यानंतर आणखी सोने घेण्यास तक्रारदार यांना प्रवृत्त केले. अर्धा किलो सोने घेण्यास सांगून त्या दोघांनी तक्रारदार याच्याकडून 19 लाख 50 हजार रुपये घेतले, मात्र सोने न देताच ते दोघे पळून गेले. फसवणूक केल्याप्रकरणी तक्रारदार याने सहार पोलीस ठाण्यात धाव घेतली. सहार पोलिसांनी गुन्हा नोंद करून तपास सुरू केला. तपासादरम्यान पोलिसांनी पल्लवीची माहिती काढली. तिला पोलिसांनी शनिवारी अटक केली. पल्लवीला न्यायालयाने पोलीस कोठडी सुनावली आहे.

























































