लेख – वेब न्यूज -दोस्त दोस्त ना रहा…

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

>> स्पायडरमॅन

शत्रू देशांनी आधुनिक तंत्रज्ञानाच्या मदतीने एकमेकांवर हेरगिरी करणे यात नवे काही नाही. पण तुमचा मित्रदेशच असे करायला लागला तर? सध्या अशाच काही दुःखातून अमेरिकेसारखी महासत्ता जात आहे. अमेरिकेच्याच एका मित्रदेशाला अमेरिकेची हेरगिरी करताना गूगलच्या ‘प्रोजेक्ट झीरो’ या हॅकिंग टीमने थ्रेट ऍनॅलिसिस ग्रुपच्या मदतीने रंगेहाथ पकडले आहे. मालवेअरच्या मदतीने हल्ला करून विंडोज, अँड्रॉइड, आयओएस या प्रणालींवरती चालणाऱया उपकरणांना या हेरगिरीत निशाणा बनवण्यात आले होते.

गेल्या 9 महिन्यात तब्बल 11 वेळा असा हल्ला करण्यात आला होता. सरकारी नेटवर्कच्या सुरक्षेला जगातील सर्वच प्रमुख देश कायम महत्त्व देत आलेले आहेत. या प्रत्येक देशाची सायबर सुरक्षा दले कायमच एकमेकांच्या संपर्कात असतात आणि प्रत्येक लहानसहान घटनेबद्दल एकमेकांना अपडेट करत असतात. मात्र याच करारामध्ये, ‘एखाद्या हॅकिंगच्या कारवाईत पकडला गेलेला देश हा मित्रदेश असेल तर त्याचे नाव उघड करू नये’ असादेखील एक प्रावधान असल्याने बहुदा हे नाव उघड करण्यात टाळाटाळ करण्यात येत असल्याची शंका सायबर तज्ञ व्यक्त करत आहेत.

अमेरिका आज पश्चिम आशियामध्ये इस्रायलला आपला सर्वात जवळचा मित्र देश मानते. मात्र दुसरीकडे अमेरिकेचीच राष्ट्रीय सुरक्षा यंत्रणा आणि सीआयए या इस्रायलपासूनच अमेरिकेला हेरगिरीचा सर्वात मोठा धोका असल्याचे कायमच सांगत असते. या प्रकरणातदेखील संशयाची सुई बहुदा इस्रायलकडेच वळण्याची शक्यता असली, तरी अमेरिकेसारख्या सर्वोच्च अर्थव्यवस्थेच्या नेटवर्क सुरक्षेची जबाबदारी ‘गूगल’सारख्या खासगी संस्थेकडे असावी का? हा प्रश्नदेखील अनेक अमेरिकन सायबर सुरक्षा तज्ञ आता विचारू लागले आहेत.