
नालासोपारा पूर्वेतील आचोळे परिसरातील मुख्य रस्त्यावर पालिकेची कचरा वाहतूक करणारी गाडी चक्क गटाराच्या झाकणात अडकल्याची घटना मंगळवारी सकाळी सुमारे ९ वाजण्याच्या सुमारास घडली. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नसली तरी शहरातील रस्त्यांची दयनीय अवस्था आणि धोकादायक गटारांचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला असून वसई-विरार पालकेच्या दयनीय कारभारावर टीकेची झोड उठली आहे.
अपघातग्रस्त घंटागाडी कचरा भरून जात असताना आचोळे परिसरात एक चाक अचानक गटाराच्या झाकणात अडकले. त्यामुळे वाहन जागेवरच अडकून पडले. घटनेनंतर काही काळ परिसरात वाहनचालकांना अडथळ्याचा सामना करावा लागला. घटनेची माहिती मिळताच पालिकेच्या घनकचरा व्यवस्थापन विभागाच्या कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. क्रेनच्या सहाय्याने कचरा गाडी गटारातून बाहेर काढण्यात आली. शहरात रस्त्यांची दुरवस्था, ठिकठिकाणी उघडी तुटलेली गटारांची झाकणे यामुळे नाराजी व्यक्त होत आहे. त्यामुळे अपघाताची शक्यता वाढली आहे.
दुर्घटनेनंतर जाग येणार का?
पालिका लाखो रुपयांचे कर वसूल करते. मात्र पायाभूत सुविधांच्या नावाने बोंब आहे. पालिकेची घंटागाडीच गटारात अडकत असेल तर पालिकेने त्यांच्या कारभाराचे आत्मपरीक्षण करणे गरजेचे आहे. मात्र रस्ते, गटारांची प्रचंड दुरवस्था होऊनही प्रशासन कानाडोळा करत असल्याने संताप व्यक्त होत असून एखादी दुर्घटना घडल्यावरच जाग येणार का, असा सवाल केला आहे.






























































