
गणपती बाप्पाचे आगमन अवघ्या अकरा दिवसांवर आल्याने बाप्पाला मखरात बसवण्याची भक्तांनी जोरदार तयारी केली आहे. यासाठी ठाणेकरांची पावले मखरांच्या दुकानांकडे वळली असून नौपाडा, घंटाळी, वंदना सिनेमा व जांभळी नाका येथील मखरांनी सजलेल्या दुकानांत प्रचंड गर्दी होऊ लागली आहे. थर्माकोलवर पूर्णपणे बंदी असल्याने इको फ्रेंडली मखरांना सर्वाधिक मागणी आहे.
गणेशमूर्ती कारखाने, गणेश पूजा साहित्य दुकानांबरोबरच ठाणेकरांची गर्दी मखरांच्या दुकानांमध्ये होत आहे. रेडीमेड मखर विकणारे आणि मखर तयार करून देणाऱ्या छोट्या उद्योजकांच्या खिशात पैसे खुळखुळणार आहेत. घंटाळी येथील पुरणपोळी घरासमोर असलेल्या एस.जे. आर्टस् या दुकानाचे मराठमोळे मालक। स्वप्नील जाधव यांनी यंदा प्रथमच इको फ्रेंडली मखरांचा व्यवसाय थाटला आहे.
केरळासन, छत्रासन, रॉयल बैठक, वुडन चेक्स, वुडन क्रॉस चेक्स, मंदिर, देवीचा मुखवटा, मोदकासनअशा विविध प्रकारच्या अडीच हजारांपासून पंधरा हजारांपर्यंत इको फ्रेंडली मखरांची रेलचेल एस.जे. आर्टसमध्ये आहे. दिप्पन आर्टस् या आधुनिक आणि आकर्षक मखरांची किंमत सर्वाधिक असली तरी त्याला भक्तांची पसंती मिळत असल्याची माहिती स्वप्नील जाधव यांनी दिली. हरिनिवास सर्कल येथे केवळ फुला-पानांची मखरे तयार करणारे गोपाल यांच्या मखरांनाही मागणी असून पाच ते सहा कारागीर ही मखरे तयार करीत असल्याची माहिती गोपाल यांनी दिली. होऊ दे खर्च .. महागाई वाढत असल्याने सगळ्याच वस्तूंच्या किमती वाढल्या आहेत. त्याचा फटका गणेशोत्सवालाही बसला आहे. पण गणपती हे आमचे आराध्य दैवत आहे. दीड दिवस, पाच दिवस, सात दिवस आणि दहा दिवस असा उत्सव साजरा करताना त्याच्या उत्सवात कोणतीही कमतरता राहू नये हीच आमची भावना आहे. त्यामुळे मखरांचे भाव वाढले असले तरीही बाप्पाची बैठक आकर्षक करण्यासाठी आम्ही कोणतीही कमतरता ठेवणार नाही. त्यामुळे महागाई झाली असली तरी होऊ दे खर्च, अशी भावना मखर घेण्यासाठी आलेल्या संदीप धोत्रे यांनी व्यक्त केली.



























































