
या देशात दोनच हिंदुहृदयसम्राट झाले, पहिले वीर सावरकर आणि दुसरे बाळासाहेब ठाकरे. या उपाध्या त्यांना लोकांनी दिलेल्या आहेत. तुमच्यात ताकद आहे तर वीर सावरकरांना भारतरत्न द्या. तसंच बाळासाहेब ठाकरे यांनाही त्यांच्यासोबत भारतरत्न मिळाला पाहिजे, अशी मागणी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते खासदार संजय राऊत यांनी केली.
‘या देशात दोनच हिंदुहृदयसम्राट झाले, पहिले वीर सावरकर आणि दुसरे बाळासाहेब ठाकरे. या उपाध्या त्यांना लोकांनी दिलेल्या आहेत. तुमच्यात ताकद आहे तर भारतरत्न द्या. का देत नाहीत. कुणी अडवलं आहे?’, असा खणखणीत सवाल राऊत यांनी यावेळी केला.
‘वीर सावरकरांना भारतरत्न द्यावं ही आमची मागणी आहे. तसंच बाळासाहेब ठाकरे यांनाही त्यांच्यासोबत भारतरत्न मिळाला पाहिजे. अनेक राज्य स्तरावरच्या राजकीय नेत्यांना भारतरत्न देण्यात आला आहे. पण बाळासाहेबांसारखा महान नेता, वीर सावरकरांसारखा स्वातंत्र्ययोद्धा क्रांतीकारक यांना भारतरत्न या किताबानं का सन्मानीत केलं नाही?’, असेही ते म्हणाले.
‘त्यांना या पदव्या दिल्यानं ते मोठे होणार नाहीत तर पदव्या मोठ्या होतील. सावरकरांवर खोटं प्रेम दाखवण्यापेक्षा त्यांना भारतरत्न द्या, ही शिवसेनेची गेल्या 15 वर्षांपासून अधिक काळापासूनची मागणी आहे, असंही त्यांनी स्पष्ट केलं.





























































