
शिवसेनेच्या यशस्वी पाठपुराव्यामुळे सुरू झालेल्या छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (सीएसएमटी) ते सावंतवाडी रोड एक्सप्रेस मंगळवार, 8 सप्टेंबरपासून कोकणवासीयांच्या सेवेत धावणार आहे. मध्य रेल्वेने गणेशोत्सवापूर्वी गाडीच्या नियमित फेऱ्या चालवण्याची खूशखबर सोमवारी दिली आणि वेळापत्रकही जाहीर केले. मंगळवारी रात्री 11.55 वाजता सुटणाऱ्या एक्सप्रेसचे आरक्षण सकाळी 8 वाजताच खुले होणार आहे. त्यामुळे रेल्वे तिकिटाच्या प्रतिक्षेत असलेल्या चाकरमान्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.
सीएसएमटी येथून थेट सावंतवाडीपर्यंत एक्सप्रेस सेवा सुरू होत असल्याने कोकणवासीयांचे थेट गाडीचे स्वप्न पूर्ण झाले आहे. मध्य रेल्वे प्रशासनाने सोमवारी गाडीच्या नियमित फेऱ्यांचे वेळापत्रक जाहीर केले. त्यानुसार गाडी क्रमांक 15087 सीएसएमटी-सावंतवाडी एक्सप्रेस पावसाळी वेळापत्रकात म्हणजेच 20 ऑक्टोबरपर्यंत दरदिवशी रात्री 11.55 वाजता सुटेल आणि दुसऱया दिवशी दुपारी 1.50 वाजता सावंतवाडीला पोहोचेल, तर गाडी क्रमांक 15088 सावंतवाडी-सीएसएमटी एक्सप्रेस सायंकाळी 5 वाजता सुटेल आणि दुसऱया दिवशी सकाळी 6.40 वाजता सीएसएमटीला पोहोचेल. नियमित वेळापत्रकात ही गाडी सीएसएमटी येथून रात्री 11.55 वाजता सुटेल आणि दुसऱया दिवशी दुपारी 2.15 वाजता सावंतवाडीला पोहोचेल, तर सावंतवाडी येथून सायंकाळी 5.20 वाजता सुटेल आणि दुसऱया दिवशी 6.40 वाजता मुंबईला पोहोचणार आहे.
उद्या सर्व फेऱयांसाठी आरक्षण उपलब्ध
सीएसएमटी-सावंतवाडी एक्सप्रेसच्या 9 सप्टेंबरपासूनच्या सर्व फेऱ्यांसाठीचे आरक्षण बुधवारी, 9 सप्टेंबर रोजी सर्व संगणकीकृत आरक्षण केंद्र आणि www.irctc.co.in या संकेतस्थळावर उपलब्ध होणार आहे. त्यामुळे बुधवारी आरक्षणासाठी ‘ऑनलाइन झुंबड’ उडण्याची चिन्हे आहेत.
या स्थानकांवर थांबा
सीएसएमटी-सावंतवाडी एक्सप्रेसला दादर, ठाणे, पनवेल, पेण, रोहा, माणगाव, वीर, खेड, चिपळूण, सावर्डा, आरवली, संगमेश्वर, रत्नागिरी, आडवली, विलवडे, राजापूर, वैभववाडी, नांदगाव, कणकवली, सिंधुदुर्ग आणि कुडाळ या स्थानकांवर थांबा दिला जाईल, असेही मध्य रेल्वे प्रशासनाने जाहीर केले.
































































