
सामना प्रतिनिधी । मुंबई
महाराष्ट्रातून पशूंच्या निर्यातीवर बंदी घालण्याबाबत गांभीर्याने विचार केला जाईल, असे आश्वासन राज्य सरकारच्या वतीने अहिंसा प्रेमींना देण्यात आले. भाजपा आमदार मंगल प्रभात लोढा यांच्या नेतृत्वाखाली अहिंसा व पर्यावरणाशी संबंधित सामाजिक संस्थांच्या प्रतिनिधींनी ही मागणी केली होती.
या प्रतिनिधी मंडळाने राज्यपाल सी. विद्यासागर राव आणि वित्त मंत्री सुधीर मुनगंटीवार यांची भेट घेऊन त्यांना यासंदर्भातील निवेदन दिले. पशू निर्यात योजना ही कृषी आणि पर्यावरणासाठी हानिकारक असून त्यामुळे पशूंच्या नाहक कत्तलीला प्रोत्साहन मिळेल, अशी भीती त्यात व्यक्त करण्यात आली आहे. आमदार लोढा यांनी यासंदर्भात केंद्रीय महिला व बालविकास मंत्री मनेका गांधी, वाणिज्य मंत्री सुरेश प्रभू आणि रस्ते परिवहन मंत्री नितीन गडकरी यांच्याशीही चर्चा केली. उद्या यासंदर्भात सुरेश प्रभू यांच्या उपस्थितीत अहिंसा प्रेमींची नवी दिल्लीत बैठकही होणार आहे.





























































