पदवीधर, शिक्षक मतदारसंघ निवडणूक, विविध शिक्षक संघटना महाविकास आघाडीच्या पाठीशी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

विधान परिषदेच्या मुंबई पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघासाठी बुधवारी, 26 जूनला निवडणूक होणार आहे. या पार्श्वभूमीवर विविध शिक्षक संघटनांनी महाविकास आघाडीचे मुंबई पदवीधर मतदारसंघाचे उमेदवार शिवसेना नेते अॅड. अनिल परब आणि मुंबई शिक्षक मतदारसंघाचे उमेदवार ज. मो. अभ्यंकर यांना जाहीर पाठिंबा दिला आहे.

महाराष्ट्र पुरोगामी शिक्षक संघटनेने मुंबई शिक्षक मतदारसंघातील महाविकास आघाडीचे उमेदवार ज. मो. अभ्यंकर यांना जाहीर पाठिंबा दिला आहे. तसेच पुरोगामी शिक्षक संघटनेचे मुंबई अध्यक्ष तानाजी कांबळे संघटनेच्या विरोधात जाऊन मुंबई शिक्षक मतदारसंघाची उमेदवारी जाहीर करून निवडणूक लढवत आहेत. त्यामुळे त्यांना संघटनेतून पुढील सहा वर्षांसाठी निलंबित केल्याचेही संघटनेच्या वतीने सांगण्यात आले. शिक्षक सेनेचे राज्य सरचिटणीस रमेश चौगुले, राज्य समन्वयक नितीन चौधरी, पुणे विभाग अध्यक्ष सुनील जगताप, पुणे जिल्हा अध्यक्ष रवींद्र वाघ, मुंबई पश्चिम अध्यक्ष हितेंद्र चौधरी, अब्दुल सत्तार आणि इतर पदाधिकारी यावेळी उपस्थित होते.

महाराष्ट्र शिक्षण संस्था संचालक मंचाच्या पदाधिकाऱयांची बैठक नुकतीच मुंबईत पार पडली. यावेळी अतिरिक्त शिक्षक, शिक्षकेतर कर्मचाऱयांची नियुक्ती, वेतनेतर अनुदान, पेन्शन आदी प्रलंबित प्रश्नांबाबत विधान परिषद सभागृहात प्रभावी आवाज उठविण्याच्या दृष्टीने सक्षम उमेदवार म्हणून मुंबई पदवीधर व शिक्षक मतदारसंघात अनुक्रमे अॅड. अनिल परब आणि ज.मो. अभ्यंकर यांना पाठिंबा देण्याचा ठराव संमत करण्यात आला, असे मंचाचे अध्यक्ष भाऊ कोरगावकर यांनी सांगितले.

आयटाचा पाठिंबा

ऑल इंडिया आयडियल टीचर्स असोसिएशन महाराष्ट्र (आयटा) या शिक्षक संघटनेतर्फे महाविकास आघाडीच्या दोन्ही उमेदवारांना जाहीर पाठिंबा दिला आहे. 1 नोव्हेंबर 2005 नंतर सेवेत असलेल्या सर्व शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱयांना जुनी पेन्शन योजना लागू करण्याच्या मुख्य मागणीसह शिक्षण क्षेत्रातील शिक्षकांच्या प्रलंबित मागण्यांच्या अनुषंगाने शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाने वेळोवेळी आग्रही भूमिका घेतली. जुनी पेन्शन योजना लागू करण्याचे, उर्दू माध्यमाच्या शाळा आणि शिक्षकांचे विविध प्रश्न मार्गी लावण्यास महाविकास आघाडी वचनबद्ध असल्याने संघटनेच्या वतीने जाहीर पाठिंबा देण्यात आला आहे, असे संघटनेचे पठाण शरीफ खान यांनी सांगितले.