
सामना प्रतिनिधी । गुहागर
कोकण पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीची तयारी जिल्हा प्रशासनाकडून पूर्ण झाली आहे. मतदारांना मतदान करणे सोयीचे व्हावे म्हणून मतदानाच्या दिवशी विशेष नैमित्तिक रजा मंजूर करण्यात आल्या आहेत. तसेच, मतदानाची वेळही दोन तासांनी वाढविण्यात आली आहे.
कोकण विभागात २५ जूनपासून पदवीधर मतदार संघाच्या निवडणूका आहेत. विधान परिषद कोकण विभाग पदवीधर मतदारसंघ निवडणूक २०१८चा कार्यक्रम, २४ मे २०१८ रोजी निवडणूक आयोग यांनी घोषित केलेला होता. यासाठी प्रशासनाने पूर्ण तयारी केली असून २५ तारखेला मतदान होणार आहे. या दिवशी विशेष नैमित्तीक सुट्याही प्रशासनाने मंजूर केल्या आहेत. सोबतच, मतदान करण्याची वेळ दोनतास वाढवलेली असून ती सकाळी ७.०० ते सायंकाळी ५.०० पर्यंत केलेली आहे.
कोकण पदवीधर मतदार संघात ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्ह्यांचा समावेश होतो. या निवडणुकीसाठी एकूण ९३ मतदान केंद्र आहेत.
कोकण पदवीधर मतदार संघात एकूण १ लाख ४ हजार २६४ पदवीधर मतदार असून त्यापैकी रायगड जिल्ह्यातील एकूण १९ हजार ९१८ मतदार आहेत. यामध्ये पुरूष ११ हजार ९३४ व ७ हजार ९८४ स्त्रियांचा समावेश आहे. ठाण्यात ४६ हजार ७५७, पालघरात १५ हजार १३५, रत्नागिरीत १६ हजार १८६ तर सिंधुदुर्गमध्ये ५ हजार ३१५ मतदार आहेत.
पदवीधर मतदार संघाची मतमोजणी २८ जूनला होणार आहे विविध राजकीय पक्षांना निवडणुकीकरीता लागणाऱ्या परवानग्या या एकाच ठिकाणी देण्यात येणार आहेत. यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात एक खिडकी योजना कार्यान्वित करण्यात आली आहे.































































